वायशेत येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, हत्या झाल्याचा नातेवाईकांचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग तालुक्यातील सासावणे येथे राहणाऱ्या समीर पाटील (30) या तरुणाने वायशेत येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी 30 एप्रिल रोजी रात्री हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान समीरच्या नातेवाईकांनी त्याची हत्या झाल्याचा संशय वक्त केला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सासावणे येथे राहणारा समीर पाटील हा मुंबई येथे नोकरी करीत होता. समीर सुट्टीनिमित्त सासवणे येथे आला होता. 30 एप्रिल रोजी वायशेत येथे कामानिमित्त गेला होता. त्यानंतर सकाळी समीर याचा मृतदेह वायशेत येथे झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. याबाबतची माहिती वायशेतचे पोलीस पाटील यांनी अलिबाग पोलीस ठाण्याला कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

समीर हा सायंकाळी घरातून गेल्यानंतर रात्री घरी आलाच नव्हता. सकाळी पोलीस ठाण्यातून समीरच्या कुटुंबीयांना फोन करून त्याने आत्महत्या केल्याचे कळविण्यात आले. मात्र नातेवाईकांकडून समीर याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे समीर याची हत्या आहे की आत्महत्या याबाबत गूढ कायम असून पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.