
नशेसाठी दोन चोरटय़ांनी प्रवाशाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच चोरटय़ाचा पाठलाग करताना तरुण लोकलखाली आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रे रोड स्थानकात घडली. बिलाम आलम शेख असे मृताचे नाव आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी आलम अकबर अली शेखला वडाळा रेल्वे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
बिलाल हा नवी मुंबईत राहत होता. शनिवारी तो त्याची बहीण आयेशासोबत हाजी अलीला जात होता. प्रवासात गाणी ऐकण्यासाठी बिलालने मोबाईल आयेशाला दिला. लोकल रे रोड स्थानकात आल्यावर आलम हा आत शिरला. त्याने आयेशाच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला. त्याचा पाठलाग करत असताना बिलाल हा लोकलखाली आला. लोकल डॉकयार्ड स्थानकात आल्यावर आयेशाने घडल्या प्रकाराची माहिती गस्तीवर असलेल्या होमगार्डला दिली. त्यानंतर जखमी अवस्थेतील बिलालला वडाळा रेल्वे पोलिसांनी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आयेशाच्या तक्रारीवरून वडाळा रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी रे रोड स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले व आरोपीच्या अटकेकरिता दोन पथके तयार केली होती. आलम हा मुंब्रा परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथून त्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
नशेकरिता करायचा चोऱ्या
आलम हा नशेकरिता चोऱ्या करतो. त्याच्या विरोधात दोन गुन्हे दाखल आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याला पोलिसांनी तडीपार केले होते. आलमने चोरीचा मोबाईल नशेकरिता एकाला पाच हजार रुपयाला विकला होता. त्याच्याकडून तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. सप्टेंबर महिन्यात चोरटय़ाचा पाठलाग करताना तरुणी बोरिवली-कांदिवलीदरम्यान पडली. जुलैमध्ये चर्नी रोड स्थानकात मोबाईलचोराचा पाठलाग करताना तरुणाचा लोकलखाली आल्याने झाला मृत्यू. मार्च महिन्यात रे रोड स्थानकात मोबाईलचोराचा पाठलाग करताना मानखुर्द येथील डॉक्टरला एक पाय गमवावा लागला होता. एप्रिल महिन्यात कुर्ला स्थानकात चोरटय़ाने विद्यार्थिनीवर हल्ला करून मोबाईल चोरून नेला होता.






























































