पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा बुडून मृत्यू, खाडीपात्रातील माडाची झावळे काढताना घडली दुर्दैवी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
drowned

पत्नीच्या डोळ्यासमोरच पतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मसुरे डांगमोडे येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. गुरुदास दत्तात्रय ठाकूर (वय 36) हा तरुण खाडीपात्रात पाण्यात भिजत घातलेली माडाची झावळे काढत असताना पाय घसरून नदीत पडला. नदीच्या पाण्यात पती बुडत असल्याचे पाहून पत्नी स्वरांजली यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला. परंतु ग्रामस्थ घटनास्थळी येईपर्यंत गुरुदासचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

मंगळवारी सायंकाळी पत्नीसह गुरुदास हा गणेश विसर्जन जेटी येथे खाडीपात्रात किनारी भिजत घातलेली माडाची झावळे काढण्यासाठी गेला होता. सदर झावळे काढत असताना पाय घसरल्याने गुरुदास थेट पाण्यात कोसळला. भरती असल्याने प्रवाहित पाण्यासमोर किनारा गाठणे अशक्य बनल्याने काही वेळातच तो नदीपात्रात दिसेनासा झाला. घटनास्थळी ग्रामस्थ व पोलीस यांनी धाव घेतल्या नंतर पोलीस पाटील सोमा ठाकूर, कॉन्स्टेबल प्रमोद नाईक यांनी पाण्याच्या पृष्ठभागावर दिसून आलेला गुरुदास याचा मृतदेह पाण्यात उतरत किनाऱ्यावर आणला. रात्री उशिरा मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले.