
डॉक्टरांना देवाचे दुसरे रुप मानले जाते. कारण डॉक्टरांमुळेच अनेक गंभीर आजार असलेल्या रुग्णांचेही प्राण वाचले आहे. परंतु काही वेळा डॉक्टरांकडूनही चुका होतात. त्यांनी केलेल्या चुकांमुळे रुग्णांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशीच एक भयंकर घटना अर्जेंटिनामध्ये घडली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात गेली होती, परंतु डॉक्टरांनी चुकून त्याची नसबंदी केली. त्यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्ज बास्टो असे या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी जॉर्ज (वय – 41) अर्जेंटिनामधील कॉर्डोबा येथे असलेल्या फ्लोरेंसिओ डियाझ प्रांतीय रुग्णालयात गेले होते. 28 फेब्रुवारी रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती परंतु काही कारणास्तव तारीख एक दिवस पुढे ढकलण्यात आली.
शस्त्रक्रियेच्या दिवशी रुग्णातील वॉर्डबॉय जॉर्जच्या खोलीत गेले. जॉर्जला काहीही न विचारता थेट ऑपरेशन थिएटरमध्ये आणले आणि आश्चर्याची बाब म्हणजे डॉक्टरांनी देखील काहीही न विचारता थेट शस्त्रक्रिया करुन जॉर्जची नसबंदी केली.
शस्त्रक्रियेनंतर जेव्हा जॉर्जला शुद्ध आली तेव्हा डॉक्टर त्यांना तपासण्यासाठी आले. डॉक्टरांकडून त्यांनी शस्त्रक्रियेबाबत माहिती घेतली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. आपल्याकडून चुकून नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकल्यावर जॉर्जच्या पायाखालची जमीनच हादरली. यानंतर डॉक्टरांनी लगेचच पित्ताशयावरही शस्त्रक्रिया केली. परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे जॉर्जने म्हटले आहे. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणाबद्दल जॉर्ज डॉक्टरांवर तसेच रुग्णालयाविरोधात तक्रार करणार आहे. यासाठी जॉ़र्ज वकिलांची मदत घेणार आहे.
डॉक्टरांनी शस्त्रक्रियेबाबत हलगर्जीपणा केला आहे. त्यांनी किमान जॉर्जच्या आजाराची माहिती घ्यायला हवी होती. त्यांच्य़ा अशा चुकांमुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे जॉर्जचे वकील म्हणाले.





























































