
सामना प्रतिनिधी । पुणे
कौटुंबिक कलह आणि घटस्फोटावरून सुरू असलेल्या वादातून एका व्यक्तीने मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीवर आणि एका वर्षाच्या चिमुरडीवर चाकूने सपासप वार करून खून केल्याची खळबळ जनक घटना ताडीवाला रस्ता येथे घडली. यानंतर या नराधमाने स्वतःवरही वार करून घेतले.
तबस्सुन शेख (वय19) आणि अलिना अयाज शेख (वय1) अशी हत्या झालेल्या मायलेकींची नावे आहेत. तर त्यांचा मारेकरी म्हणजेच तबस्सुन हिचा पती अयाज शेख याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तबस्सुन आणि आयाज यांचे एकमेकांशी पटत नसल्याने तबस्सुन ही तिच्या आईकडे ताडीवाला रोड येथे येऊन राहत होती. या दोघांमध्ये घटस्पोट घेण्यावरून वाद चालू होता. तबस्सुन ही शेखचे ऐकत नसल्याने तो तिच्यावर प्रचंड चिडलेला होता. मध्यरात्री तीनच्या सुमारास तबस्सुन आणि अलीना घरात झोपलेले असताना आयाज हा खिडकीतून आतमध्ये शिरला. गाढ झोपेत असलेल्या दोघांवरही त्याने चाकूने वार केले. घरात प्रचंड आरडाओरडा सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. चाकूने भोसकल्याने तबस्सुन आणि एका वर्षाच्या अलीनाचा जागीच मृत्यु झाला. यावेळी आयाजने स्वतःवरही वार करून घेतल्याने तो गंभीर जखमी झाला.
या घटनेची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आयाजला रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.



























































