अनैतिक संबंध व पैशाच्या कारणावरून खून, पानचिंचोलीत सापडलेला मृतदेह पंढरपुरातील व्यक्तीचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जहिराबाद मार्गावरील पानचिंचोली शिवारात सापडलेला अनोळखी व्यक्तिच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ती मृत व्यक्ती पंढरपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. अनेतिक संबंध व पैशाच्या कारणावरून त्याचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह एका युवकास अटक केली आहे.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 30 मे रोजी मौजे पानचिंचोली येथे लातूर ते जहिराबाद मार्गावर रोडच्या बाजूला नालीमध्ये एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरून पोलीस ठाणे निलंगा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलीस ठाणे निलंगाचे पोलीस निरीक्षक शेजाळ हे स्टॉपसह घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली व मयताचे फोटो काढून शोधपत्रिका तयार करण्यात आली.

सदर वर्णनाच्या इसमा बाबत मिसिंग दाखल असले बाबत इतर पोलीस ठाण्याकडून माहिती घेण्यात आली, परंतु उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती. मरणाचे नक्की कारण समजून येण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ग्राम प्रशासनाच्या मार्फत पानचिंचोली येथे दफनविधी करण्यात आला. पथकातील पोलीस अधिकारी अमलदार हे माहितीचे संकलन करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, सदर मयत व्यक्तीच्या वर्णनाचा इसम पंढरपूर येथून बेपत्ता आहे. बेपत्ता व्यक्तीचा वर्णन व प्रेताचे वर्णन हे तंतोतंत जुळत असून सदर मयताचे नाव भानुदास जगन्नाथ माळी, वय 60 वर्ष ,राहणार सुपली ता. पंढरपूर जि. सोलापूर असे असले बाबत त्याचे नातेवाईकाकडून माहिती मिळाली.

तपासादरम्यान पंढरपूर येथील तपास पथकाशी संपर्क करून तसेच मयताची गोपनीय व इतर भौतिक माहिती प्राप्त करून त्याचे विश्लेषण केले असता मयत माळी हे एका महिला व पुरुषाच्या त्यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून तपास पथक व पोलीस निरीक्षक शेजाळ, इनामवाडी तालुका निलंगा येथे जाऊन संशयित अमरनाथ अशोकराव किने (वय 21 वर्ष, रा इनामवाडी) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने पंढरपूर येथील एका महिलेच्या सहाय्याने भानुदास माळी यास पंढरपूर येथून सोबत घेऊन पानचिंचोली रोडवर गाडीमध्ये गळा आवळून खून केल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसाच्या तपास पथकाने सदर महिलेला ताब्यात घेऊन चौकशी कामी निलंगा येथे आणले चौकशी दरम्यान तिने तिचा मित्र अमरनाथ किने याचे सहाय्याने भानुदास माळी याचे सोबत असलेल्या पैशाच्या व्यवहारावरून व त्याच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून खून केल्याचे सांगितले.

सदर प्रकरणात मयत व्यक्तीच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन निलंगा येथे गुरनं 150/22 क्र.302, 201, 34 भादवि प्रमाणे दाखल केले असून गुन्ह्यात वर नमूद आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ हे करीत आहेत.