
पेट्रोल पंपावरील दिवसभर जमा झालेली रक्कम घेऊन घराकडे निघालेल्या मालकाची गाडी तिघा जणांनी अडवून गाडीच्या काचा फोडून चार लाख रूपयाची रक्कम चोरट्यांनी पळवल्याची घटना रविवारी रात्री उशिरा गेवराईजवळ घडली.
गेवराई येथील ओमप्रकाश मदनराव बेद्रे आणि अमोल दिलीप कुलथे या दोघांच्या भागीदारीत पेट्रोलपंप आहे. रविवारी दिवसभर जमा झालेली रक्कम 3 लाख 76 हजार 850 रूपये काळ्या बॅगमध्ये घेऊन ओमप्रकाश बेद्रे रविवारी रात्री अकरा वाजता स्वत:ची कार एमएच 23 एडी 4011 घराकडे निघाले होते.
राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपंपापासून अंदाजे तीनशे मिटरवर रस्ता दुभाजक ओलांडण्यासाठी ते थांबले होते. तेव्हा अचानक शहागडच्या दिशेने एक विनाक्रमांकाची कार त्यांच्या गाडीला आडवी आली. त्यातील दोघे जण बेद्रे यांच्याजवळ आले आणि गाडीतील बॅग दे अन्यथा जीवे मारू अशी धमकी त्यांनी दिली.
त्याचवेळी एकाने लोखंडी टामीने कारची काच फोडली आणि पुढच्या सीटखाली ठेवलेली पावणेचार लाख रूपयाची बॅग घेऊन कारमधून पसार झाले. या प्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांविरूद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































