
सामना ऑनलाईन । कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये एका ३५ वर्षीय मजुराला भटक्या कुत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लेक टाऊनमधील पातिपुकुर येथे एका खोके तयार करण्याच्या कंपनीत या विकृत आरोपीने हे कृत्य केले. कमलेश महतो असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात भादंवि कलम ३७७ याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाल्यास या विकृताला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या कुत्रीवर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कमलेश एका पेपर कंपनीत मजुर असून कंपनीने दिलेल्या फ्लॅटमध्ये पत्नी व तीन मुलांसह होता. गेल्या आठवड्यात त्याची पत्नी मुलांबरोबर एका नातेवाईकाच्या लग्नास गेली होती. यामुळे कमलेश घरात एकटाच होता. रात्रीच्या नऊच्या सुमारास तो घराबाहेर पडला व त्याने रस्त्यावर फिरणाऱ्या एका भटक्या कुत्रीला पकडले व तिला जबरदस्तीने घराशेजारी असणाऱ्या कंपनीत घेऊन गेला. तिथे त्याने कुत्रीवर लैंगिक अत्याचार केले. यावेळी कुत्री भुंकत असल्याने कंपनीजवळून जाणाऱ्या तीन तरुणांना संशय आला व ते आत गेले. समोरचे दृश्य बघून तिघेही हादरले. तरुणांना बघताच कमलेशने तिथून पळ काढला. त्यानंतर तरुणांनी जखमी कुत्रीला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिघा तरुणांनी कमलेश विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तात्काळ कमलेशला अटक केली. चौकशीत त्याने आपण याआधीही अनेक कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली.
























































