
इटलीतील मिलान शहरातील न्यायालयात आलेल्या सहा महिलांनी त्यांच्या कहाण्या सांगितल्या. त्यांच्यावर जे भयंकर अत्याचार झाले ते ऐकून भल्याभल्यांच्या अंगावर काटा आला आहे. प्रख्यात औषध कंपनीचा सर्वेसर्वा अंतोनिओ फाजिओ हा आरोपीच्या पिंजऱ्यात असून त्याने जनावरही लाजेल इतक्या विकृतपणे या महिलांवर अत्याचार केले आहेत. पीडीत महिलांना अंतोनिओने नोकरीसाठीच्या मुलाखतीसाठी बोलावलं होतं. या महिलांवर बलात्कार करून अंतोनिओने त्यांना अनेक दिवस त्याच्या राजमहालाप्रमाणे घरात कैद करून ठेवलं होतं. यातील एका तरुणीला तर त्याने 2 महिने डांबून ठेवल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
ग्लोबल फार्मा ही अंतोनिओची औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. कंपनीमध्ये इंटर्नशिप सुरू असल्याची त्याने जाहिरात दिली होती. यासाठी 20 ते 30 वयोगटातील तरुणींनी अर्ज केले होते. यातील निवडक तरुणींना अंतोनिओने मुलाखतीसाठी बोलावले होते. अंतोनिओने एकाही तरुणीची मुलाखत घेतली नाही. तो या तरुणींना गुंगीचे औषध घातलेलं पेय द्यायचा, जे प्यायल्यानंतर ते बेशुद्ध व्हायच्या. यानंतर अंतोनिओ तरुणींना विवस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि मोठा पुरस्कार मिळाला आहे अशा पद्धतीने नग्न तरुणींसोबत फोटो काढायचा. या तरुणींना फाजिओ कुटुंबीयांनी धमकावल्याने त्या पोलिसांत जायला घाबरत होत्या, मात्र एका तरुणीने हिम्मत करून तक्रार केली, ज्यानंतर पोलिसांनी अंतोनिओविरोधात कारवाईला सुरुवात केली होती. ही कारवाई पाहून बळ मिळाल्याने 5 तरुणी पुढे आल्या आणि त्यांनीही अंतोनिओविरोधात तक्रार केली.
अंतोनिओच्या मोबाईलमध्ये आणि अन्य उपकरणांमध्ये 54 महिलांचे फोटो सापडले आहेत, यावरून पीडीत महिलांची संख्या बरीच मोठी असावी असा अंदाज बांधला जात आहे. या सगळ्या फोटोंमध्ये अंतोनिओच्या मिलान येथील घरातील करड्या रंगाचा सोफा, गालिचा आणि सारखा बेड दिसतो आहे. यावरून पोलिसांना पीडीत तरुणींची संख्या जास्त असल्याची दाट शक्यता वाटते आहे. हे सगळे फोटो ऑक्टोबर 2020 पासून अंतोनिओला अटक होण्यापर्यंतचे आहेत. या फोटोंवरून अंतोनिओने हे विकृत चाळे त्याआधीही केले असावेत असा पोलिसांना संशय आहे. यातील एका तरुणीवर अंतोनिओने जेव्हा बलात्कार केला तेव्हा त्याची आई आणि 12 वर्षांचा मुलगा हे दोघेही घरी होते. अंतोनिओ आणि त्याची बहीण मारिआ यांनी पीडीत तरुणींचे आरोप फेटाळून लावले असून हे सगळं पैसे उकळण्यासाठी केलं जात असल्याचा या दोघांनी आरोप केला आहे.




























































