
बिहारची राजधानी पाटणा येथे गुरुवारी दुपारी एका व्यक्तीने पत्नी आणि मुलीची गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राजीव असे या गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने घटस्फोटित पत्नी प्रियांका भारती आणि मुलगी संस्कृती भारतीची या दोघांची हत्या केली. पत्नी प्रियांका सचिवालयात काम करायची. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पाटणा पोलीस कसून तपास करत आहेत.
पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मेहुणीशी केले होते लग्न
राजीवच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने मेहुणी प्रियांका भारती हिच्याशी लग्न केले. परंतु लग्नानंतर त्यांचे संबंध चांगले नव्हते. राजीवची मुलगी संस्कृती भारती ही त्याच्या पहिल्या पत्नीपासून जन्मलेली मुलगी होती. काही दिवसांपूर्वी प्रियांका भारतीचा राजीवसोबत घटस्फोट झाला होता. यानंतर प्रियांका अनिसाबाद येथील पोलीस कॉलनीत आई आणि मुलगी संस्कृती सोबत भाड्याच्या घरात राहू लागली.
वडिलांसोबत मुलीचे संबंध चांगले नव्हते
वडिलांसोबत संस्कृतीचे नाते चांगले नसल्याने तिला राजीव सोबत राहायचे नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका 3 दिवसांपूर्वी तिची आई आणि संस्कृतीसोबत एका लग्नात सहभागी होण्यासाठी बेगुसरायला गेली होती आणि गुरुवारी ती पाटण्याला परतली. प्रियांका आणि संस्कृती गुरुवारी पाटण्याला परतणार असल्याची माहिती राजीवला होती. या दोघांच्या हत्येचा कट त्याने आधीच रचला होता. त्यानुसार त्याने लोडेड पिस्तूलने त्यांच्यावर घराबाहेर हल्ला केला.
आधी मुलीवर झाडल्या गोळ्या
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात प्रियंका, तिची आई आणि संस्कृती घराच्या दारात पोहोचताच राजीवने त्यांच्यावर हल्ला केल्याचे दिसत आहे. त्याने आधी मुलगी संस्कृती आणि नंतर प्रियांकावर गोळ्या झाडल्या. यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. राजीवकडे पिस्तूल आणि गोळ्या कुठून आल्या, याचा तपास पोलीस करत आहेत.

























































