
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं की सारंच कसं उद्ध्वस्त होतं, हे दर्शविणारी विदारक घटना शिरूर तालुक्यात घडली. भावामुळे नोकरी गेली या संशयातून सावत्र भाऊ आणि त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करणारा पळून जाताना कारच्या धडकेत ठार झाला. त्याने केलेल्या हल्ल्यात त्याची वहिनी ठार झाली असून, सावत्र भावाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. आंबळे गावातील या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.
प्रियंका सुनील बेंद्रे (वय 28) असे या हल्ल्यात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. होता. त्यांचे पती सुनील (वय 30) हे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर हल्ला करून मोटारसायकलवरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेला अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय 30) हा कारच्या धडकेने ठार झाला. या मुलांचे वडील बाळासाहेब पोपट बेंद्रे (वय 59) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. बाळासाहेब बेंद्रे हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आंबळे येथे राहतात. अनिल हा पुण्यातील एका कंपनीत काम करत होता. भाऊ आणि वहिनी हे दोघे लंडन येथे नोकरीसाठी जाणार असल्यामुळे वडिलांनी शेती करण्यासाठी गावी परत बोलाविले. त्यामुळेच आपली नोकरी गेली असा संशय अनिल याला होता.
सुनील आणि त्यांची पत्नी प्रियंका हे दोघे घराच्या टेरेसवर झोपले होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अनिल तेथे गेला. त्याने लोखंडी डंबेल्स, चाकू आणि विटांनी झोपेत असलेल्या दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्रियंका मरण पावली, तर सुनील गंभीररीत्या जखमी झाला. तर घटनेनंतर अनिल हा मोटारसायकलवरून पळून जात असताना न्हावरे – चौफुला रस्त्यावर स्विफ्ट कारची धडक बसून तोही गंभीर जखमी झाला. ससून येथे उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला..
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी आणि पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करीत आहेत.
स्वप्न अधुरेच राहिले
सुनील व प्रियंका हे दोघेही आयटी इंजिनिअर होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना लंडन येथे जॉब करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे ते खूप आनंदात होते. १ मे रोजी ते जाणार होते; मात्र काळाने दुर्दैवी घाला घातला. त्यांचे सुखी संसाराचे स्वप्न अधुरेच राहिले, अशी भावना प्रियंकाचे भाऊ स्वप्नील सयाजी भोसलकर (वाघोली) यांनी व्यक्त केली.































































