
मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला गळती लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.पाटबंधारे विभाग आणि महसूल प्रशासनाने सतर्कता दाखवत गळती होत असलेल्या ठिकाणी सिमेंटची पोती आणि भराव टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.धरण परिसरातील सहा वाड्यांमधील ग्रामस्थांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे.
पणदेरी धरणातून गळती सुरू झाल्याने तिवरे सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. धरण परिसरात 15 गावे असून पायथ्याशी सहा वाड्या आहेत. सतर्कता म्हणून प्रशासनाने परिसरातील ग्रामस्थांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी घटनास्थळी जाऊन धरणाची पहाणी केली.
वैशाली नारकर यांनी सांगितले की, घाबरण्याचे कारण नाही. धरणाला लागलेली गळती थांबवण्याचे काम सुरू आहे.पोती आणि भराव टाकून गळती थांबवली जात आहे. धरण रिकामे करण्यावर आमचा भर असल्याचे सांगितले.
परिसरातील 150 ग्रामस्थांचे स्थलांतरण केले असून त्याची व्यवस्था शाळेत करण्यात आली आहे. काहीजण आपल्या नातेवाईकांकडे गेले आहेत.सतर्कता म्हणून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले आहे.
– नारायण वेंगुर्लेकर तहसीलदार, मंडणगड

























































