
महायुती सरकारने आपले स्टार्टअप धोरण नुकतेच जाहीर केले. त्यात 50 हजार नवे स्टार्टअप सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र राज्यातील स्टार्टअपच्या अपयशाचा दर 90 टक्के असल्याची कबुली रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. त्यानंतरही हे नवीन उद्योग सुरू करण्याचा घाट सरकारने घातल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून हे नवे उद्योग नेमके कुणासाठी सुरू केले जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्टार्टअपच्या संख्येत देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात 29 हजार 147 नोंदणीकृत स्टार्टअप आहेत. परंतु स्टार्टअप अपयशी होण्याचा दर राज्यात 90 टक्के आहे, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. अपयशाचा दर इतका मोठा असतानाही मोठय़ा संख्येने नवे स्टार्टअप का सुरू केले जात आहेत याबद्दल बोलताना, तो दर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे लोढा यांनी सांगितले. पुढील दोन वर्षांत 90 टक्के स्टार्टअप यशस्वी ठरल्याचे दिसेल, असा दावाही त्यांनी केला. स्टार्टअप निधीअभावी फेल होऊ नयेत याची विशेष काळजी नव्या धोरणात घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.