दोडामार्ग तालुक्यातील मांगेली धबधबा प्रवाहित; कोरोना प्रादुर्भावामुळे पर्यटकांना येण्यास मनाई

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली ( फणसवाडी ) येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही या कोसळणाऱ्या धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असल्याने येथे परवानगी कधी मिळणार, याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यांसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो पर्यटकांसाठी वर्षा पर्यटनात हा धबधबा आकर्षणाचा केंद्र असते. कोरोनामुळे येथे पर्यटकांस येण्यास बंदी असल्याने परिसरात पर्यटक नसल्याने शुकशुकाट जाणवत आहे.

सह्याद्रीच्या कडेकपारीतून कोसळणारा धबधबा, दाट धुके, सतत रिमझिम पडणारा पाऊस , या सर्व गोष्टी एकत्रित मांगेली धबधबा आणि तेथील परिसरात अनुभवण्यास मिळतात. म्हणूनच गेल्या 15 ते 20 वर्षापासून हे स्थळ पर्यटकांचे वर्षा पर्यटनाचे केंद्र बनले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.

दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी येतात. त्यामुळे स्थानिकांनाही हॉटेल व्यवसायातून आर्थिक उत्पन्नाचे साधन प्राप्त होते. मात्र, दोन वर्षात या सर्वच उलाढालीला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांकडून कोरोनाचे संक्रमण वाढू नये, यासाठी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकास येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या परिसरात शुकशुकाट आहे. आठ दिवसांपूर्वी कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी मांगेलीचे सरपंच विश्वनाथ गवस यांनी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांस येण्यास बंदी असल्याचे जाहीर केले आहे. तसेच तालुका प्रशासनालाही लेखी पत्र देत सहकार्य करण्याची विनंती केलेली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या