अवलिया- बाबुराव आणि दुखणे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश उदगीरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते.  हे  तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

तीन दिवसांपासून महाभारतामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत  आहेत हे दृश्य चालू आहे. दोन्ही बाजूचे सैन्य, महारथी, अतिरथी, अर्धरथी खोळंबून उभे आहेत. प्रेक्षकांची उत्कंठा इतकी शिगेला पोहोचलेली आहे की आता युद्ध सुरू होईल, तेव्हा सुरू होईल, पण अर्जुनाच्या शंका काही संपायची चिन्हे दिसत नव्हती, आणि तेवढय़ाच शांतपणे त्या शंकांचे निरसन करण्याची श्रीकृष्णाची वाग्वाणीही. हे पाहताना काही कारण नसताना एक जुनी आठवण आली आणि मला हसू आले.

कॉलेजात असताना आमचे एक ज्येष्ठ मित्र आमच्या वर्गात होते. बाबुराव! फार तर एखाद्या वर्षाचे अंतर आमच्या वयात असले तरी ज्येष्ठ एवढय़ासाठी की, त्यांचे लग्न झालेले होते.  इथे आम्ही कशात काय आणि फाटक्यात पाय अशा अवस्थेत असताना बाबुरावांनी लग्नापर्यंत मजल मारली होती. शिवाय गडी उंचापुरा, आडदांड, रापलेल्या चेहऱयाचा. ‘कॉलेज कुमार’च्या व्याख्येशी पूर्ण फारकत घेतलेला. आम्ही मोठय़ा भावांच्या जुन्या पँट अल्टर करून का होईना, त्या वापरून आपली तरुणाई जपत होतो. पण बाबुराव मात्र ढगळा लेंगा, सदरा, टोपी या वेशात असायचे. माणूस सरळ भोळा सांब! या त्यांच्या सात्त्विकपणालाही एक बेरकीपणा लगडलेला होता. आम्हा चार-पाच जणांच्या टोळक्यात ते पोक्त वाटत असले तरी स्वभाव जेवढा प्रेमळ तेवढाच संशयी. हा संशय इतरांवर नसायचा तर स्वत:वरच असायचा. तेही प्रकृतीच्या संदर्भात. आपल्याला काहीतरी होतंय या शंकेने ते पछाडलेले असायचे. एकदा तर कहरच झाला.

‘’आता मी काय जगत नाही!”चा घोषा लावून बसले. हातपायच गाळले म्हणा ना. आम्ही पोरे हवालदिल झालो, पण काय करणार? एखाद्या डॉक्टरकडे न्यावे तर खिसे रिकामे. आमचेही आणि त्यांचेही. कारण बाबुराव एकटेच भावासोबत खोली करून राहत होते. गावाकडे निरोप पाठवावा तर तेवढा वेळ थांबण्याची त्यांची अवस्था दिसेना. मग आम्ही हिंमत करून लातुरातल्या एका मोठय़ा दवाखान्यात गेलो. समोरच एक पाटी दिसली, ‘डॉ. भराडिया, एमडी’! त्या काळात दवाखाने आजच्या मानाने शांत असायचे. हळूच केबिनचे दार नॉक केले. ’कम इन!’ भारदस्त आवाज आला. बाबुरावसोबत आम्हा चार-पाच जणांची टोळी चोरटय़ासारखी आत शिरली. समोरच्या टेबलामागे डॉक्टर प्रसन्न मुद्रेने बसलेले. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतके आश्वासक होते की, बाबुरावांनी ओठच काढले. आता रडतात की काय, अशी भीती वाटायला लागली. मी गडबडीने पुढे झालो. माझी ओळख सांगितली. ते माझ्या बंधूंना ओळखत होते.

“अरे! मी ओळखतो त्यांना! काय प्रॉब्लेम आहे?”

मी एका दमात बाबुरावची हिस्ट्री त्यांना सांगितली आणि लगेच आमच्याकडे पैसे नसल्याचेही, ते हसले.

“कोणय पेशंट?”

आम्ही बाबुरावना पुढे केले. त्यांनी त्यांना बाजूच्या टेबलावर झोपवले आणि त्यांना प्रश्न विचारत तपासायला सुरुवात केली.

‘’तुम्हाला नक्की काय होतंय?”

‘’उगं भ्या वाटतंय बगा. कायतरी व्हाय लागलंय म्हनून. लई घबराट होतीय!”

‘’उतरा खाली!” बाबुराव परत खुर्चीवर बसले.

‘’हे पहा! तुम्हाला काहीही झालेलं नाही. यू आर ए स्ट्राँग मॅन!” डॉक्टर खेळीमेळीने म्हणाले.

‘’पन परवा बगा छातीत उजव्या बाजूला दुकू लागल्तं.”

‘’गॅसेसमुळं होत असतं असं कधी कधी. घाबरायचं नाही. मस्त तब्येत आहे तुमची बाबुराव!”

‘’बरं, तसं म्हनावं तर परवा पायात लचकच भरली बगा. म्हनलं आता लकवा मारतोय का काय!”

‘’असं छोटय़ा मोठय़ा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात.”

‘’बरं, पन दोन म्हैन्या खाली…” डॉक्टरांचा चेहरा थोडा वैतागल्यासारखा दिसू लागला होता.

‘’एक काम करू. तुमचं पीनिंग करून घेऊ.”

बाबुरावांना पीनिंग मशीनसमोर उभे करून आपादमस्तक चेक करून झालं. डॉक्टर हसतमुखानं खुर्चीवर बसले.

‘’समोर बसा!” बाबुराव स्थानापन्न झाले.

‘’आता मी काय सांगतो ते नीट ऐका. माझ्या संपूर्ण वैद्यकीय सर्व्हिसमध्ये मी तुमच्यासारखा दणकट माणूस पाहिला नाही. तुम्हाला काही झालं नाही आणि पुढच्या दहा वर्षांत काही होणार नाही. झालं समाधान?”

बाबुरावांची रुंद जिवणी अजूनच रुंदावली!

‘’डॉक्टरसाहेब, लई उपकार झाले. गावाकडून आले की, फीस पवचती करतो!”

‘’अरे, काही गरज नाही! वुई आर फ्रेंडस् ना? झालं तर मग!”

आम्ही डॉक्टरांचे आभार मानून निघालो. दारापर्यंतच गेलो असू, बाबुराव परत फिरले. डॉक्टरांपाशी गेले आणि उजवा हात पालथा करून त्यांच्यासमोर धरला आणि त्यांना विश्वासात घेत विचारलं,

‘’डॉक्टरसाहेब! ह्यो उजव्या बोटाच्या खाली लालसर वन दिसायलाय, च्या मायला लेप्रशी तर नसंल?”

डॉक्टर त्यांच्याकडे हताश नजरेने पाहत राहिले. त्यानंतर वेगाने त्यांच्या चेहऱयावरचे रंग बदलत गेले.

‘’गेट आऊट!” ते ओरडले. आम्ही गर्भगळीत! बाबुराव निरागस चेहरा घेऊन आमच्याकडे आले. त्यांचे बकोट धरून आम्ही त्यांना बाहेर खेचत आणले.

‘’आरं माजं काय चुकलं ते तरी सांगा की!”

त्या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे त्यांच्या नसलेल्या दुखण्यात भर टाकण्यासारखं होतं!

  [email protected]