भाजप हायकमांडमुळे आजारी पर्रिकर अद्याप मुख्यमंत्रीपदावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हायचे होते मात्र भाजपच्या हायकमांडच्या इच्छेमुळे ते अद्याप मुख्यमंत्रीपदावर असल्याचा दावा गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून सध्या सुरू असलेल्या वादात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

‘गणेश चतुर्थीच्या वेळी जेव्हा पर्रिकर रुग्णालयात अॅडमिट होते तेव्हाच त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा होता. तसेच त्यांच्याकडील खातीही त्यांना इतर मंत्र्यांना द्यायची होती. मात्र त्यानंतर काही घडामोडी घडल्या, भाजप हायकमांडने यात मध्यस्थी केली. त्यानंतर राजीनामा देणं हे पर्रिकरांच्या हातात राहिलेले नाही’, असे सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला आहे. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यावर अमेरिकेत तसेच दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 14 ऑक्टोबरपासून त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.