मनोज जरांगे पाटील आरोग्य तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरात

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून 14 सप्टेंबरपर्यंत 17 दिवस बेमुदत उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपोषण सोडले. त्यानंतर आज रविवारी त्यांना आणि इतर उपोषणार्थींना आरोग्य तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना दोन दिवस उपचार घेण्याचा सल्ला दिल्याने जरांगे पाटील आणखी दोन दिवस या हॉस्पिटलमध्येच राहणार आहेत.

तब्बल 17 दिवसांचे उपोषण सोडल्यानंतरही 3 दिवस उपोषण मंडपातच त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू होते. उपोषण सोडताना जरांगे पाटील यांच्या तब्येतीची आणि सुरक्षेची काळजी मी घेईल, असे सांगितले होते. काल छत्रपती संभाजीनगर मंत्रिमंडळाची बैठक होती, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला की, छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई येथे उपचार सुरू करावेत.

त्यानुसार आज रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी होणार असून, त्याकरिता ते आंतरवाली सराटीतून शासकीय रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात जाऊन तिथे त्यांच्या सर्व चाचण्या करून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

बेमुदत उपोषण केल्याने डॉक्टरांनी त्यांना चांगल्या हॉस्पिटलला जाऊन शारीरिक तपासण्या करण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला ऐकत त्यांनी तपासणी करण्यासाठी जरांगे पाटील यांनी होकार दिला. मराठा आरक्षणासाठी 17 दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या आज रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये तपासण्या सुरू आहेत. त्यासाठी मनोज जरांगे आज आंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगरकडे रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत 25 वाहनांच्या ताफ्यातून शेकडो मराठा समाजबांधवही रुग्णवाहिकेसोबत छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले.

रुग्णवाहिकेजवळ आंदोलकांची गर्दी
जरांगे पाटील यांना पुढील आरोग्य तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून संभाजीनगरला आज रविवारी नेण्यात आले, तेव्हा गॅलेक्सी रुग्णालयाजवळ रुग्णवाहिका येताच रुग्णवाहिकेला शेकडो मराठा आंदोलकांनी घेरून गर्दी केली होती. यावेळी जरांगे पाटील यांच्या नावाने घोषणा दिल्या जात होत्या. जरांगे पाटील यांनी रुग्णवाहिकेतूनच आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी माईकचीही व्यवस्था करण्यात आली होती.

आंदोलन बंद करणार नाही – जरांगे पाटील
17 दिवस उपोषण झाले. शरीराच्या तपासण्या करणे आवश्यक होते तसे जिल्हा प्रशासन आणि सरकारचे म्हणणे होते. समाजाचेही म्हणणे होते. त्यामुळे गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलो. तपासण्या झाल्या की आंदोलन ठिकाणी येणार आहे. मी आंदोलन मागे घेतले नाही. तुम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी हटणार नाही, आंदोलन बंद करणार नाही व माझी जागाही सोडणार नाही, मग मेलो तरी बेहत्तर. मी तपासण्या करण्यासाठी आलो आहे. डॉक्टरांनी सल्ला दिल्याने मी इथे आलो आहे. फक्त तपासण्या करणार आहे. त्या झाल्या की पुन्हा जागेवर जातो, प्रत्येक आंदोलन शांततेत करा, अशी विनंतीही त्यांनी केली.