
दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेतील शौर्य प्रदीप पाटील या मराठी विद्यार्थ्याने शाळेतील काही लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. तो सांगलीचा असून मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत शौर्यच्या कुटुंबीयांची आज भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या प्रकरणात केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करावी. संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी. अमित शहा यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे. संबंधित आरोपींना लवकर अटक व्हायलाच हवी. अन्यथा आम्हाला आंदोलन हाती घ्यावे लागेल. तशीच वेळ आली तर आम्ही मुंबईसारखी दिल्लीही तुंबवू, असा इशारा जरांगे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिला.
राष्ट्रवादीचे खासदार शहांना भेटले
सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली व शौर्य पाटील मृत्यूप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्या तसेच डॉ. संपदा मुंडे आत्महत्येच्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.






























































