मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; आंतरवली सराटी येथे साखळी उपोषण करणार

आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरदरम्यान बेमुदत उपोषण केले. सलग 17 दिवसांनंतर त्यांनी उपोषण मागे घेत साखळी उपोषणाची घोषणा केली होती. मात्र, अशक्तपणा आल्यानंतर त्यांना रविवारी (ता. 17 रोजी) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. या उपचारानंतर जरांगे पाटील थेट जालन्याच्या आंतरवाली सराटीत जाऊन पुन्हा एकदा साखळी उपोषण करणार आहेत.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उग्र आंदोलन सुरू केले होते. मात्र, उपोषणादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यामुळे हे आंदोलन चिघळून महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले. या लाठीहल्ल्याप्रकरणी टीकेची चौफेर झोड उठल्यानंतर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू करून चार ते पाच बैठका निष्फळ ठरल्या आहेत. यानंतर मुंबईच्या बैठकीनंतर सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना आरक्षणाचा लाभ देण्याची तयारी दर्शवली, पण यासंबंधीच्या जीआरमध्ये त्यांनी वंशावळीची अट टाकली. या अटीवर जरांगे पाटील यांनी हरकत घेतल्यामुळे त्यांची सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरली. त्यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे.

महिन्याभरात आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा उषोषणाचे हत्यार उपासणार
अशक्तपणा जाणवू लागल्याने जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात 4 दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना गुरुवारी डिस्चार्ज दिल्यानंतर ते शासकीय रुग्णवाहिकेतून थेट उपोषणस्थळाकडे रवाना झाले. मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू राहणार आहे. सरकारला दिलेल्या महिनाभराच्या मुदतीत आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर ते पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसून सरकारविरोधात दंड थोपटणार आहेत.