
मराठा आरक्षणासंदर्भात सगळे काही स्पष्टपणे ठरलेले आहे. जे ठरले आहे ते कागदावर असून त्याप्रमाणेच आम्हाला आरक्षण द्या, असे खडेबोल मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सुनावले. गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने देऊनही आमच्याशी दगाफटका केला, असा आरोपही त्यांनी केला. आरक्षणासंदर्भात सरकारने काय केले, याचा खलिता मला मिळाला असून रविवारी होणार्या बैठकीत त्यावर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने आतापर्यंत काय केले, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी करताच सरकारचे शिष्टाईमंत्री गिरीश महाजन आणि संदिपान भुमरे हे लगबगीने आज शनिवारी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. सरकार, शिंदे समिती करत असलेल्या कामाची माहिती त्यांनी जरांगे यांना दिली. टिकणारे आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असून विधिमंडळातही त्यावर साधक-बाधक चर्चा झाली. 18 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री चर्चेला उत्तर देणार आहेत. आरक्षणाच्या सर्व प्रक्रियेसाठी अधिक वेळ लागणार आहे. त्यामुळे 24 डिसेंबरची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती गिरीश महाजन यांनी केली.
मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचे मंत्री, अधिकारी, सरकारने पाठवलेले खास दूत यांच्या साक्षीने सर्व काही स्पष्ट ठरले आहे. जे ठरले आहे तेच आम्ही मागत आहोत, त्यापेक्षा अधिक आम्हाला काही नको, असे मनोज जरांगे यांनी निक्षून सांगितले. सरकारने दिलेली माहिती रविवारी होणार्या मराठा समाजाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. त्यावर विस्ताराने चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सरकारने शब्द देऊनही गुन्हे मागे घेतले नाहीत
मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला होता. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात बोलताना जाळपोळीत मराठा कार्यकर्त्यांचा सहभाग नसल्याचे सांगितले. तरीही बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल होत आहेत. यापूर्वी दाखल झालेले गुन्हेही मागे घेण्यात आले नसून आमच्याशी दगाफटका करण्यात आला, असा स्पष्ट आरोप मनोज जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाशी बोलताना केला.
भुजबळांना आवरा
आम्हाला कुणाच्याही हक्काचे नको आहे. आमच्या वाट्याचे जेवढे आहे तेवढेच आम्ही मागत आहोत. परंतु, छगन भुजबळ आपल्या जहरी विधानांनी त्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. भुजबळांना आवर घालण्याचा प्रयत्न सरकारकडून होत नाही. त्यामुळे सरकारचा याला पाठिंबा आहे की काय, अशी शंका मराठा समाजाला आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले. भुजबळांना आवरा, असेही त्यांनी सरकारला बजावले.
महाजनांचे तुणतुणे
मराठा आरक्षणावर सरकारने काय काय केले, अशी विचारणा मनोज जरांगे यांनी करताच मिंधे सरकारची घाबरगुंडी उडाली. सरकारचे शिष्टाईमंत्री गिरीश महाजन आणि संदिपान भुमरे हे लगबगीने मनोज जरांगे यांच्या भेटीला हजर झाले. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये तब्बल दीड तास महाजन यांनी जुनेच तुणतुणे वाजवले. जरांगे यांनी प्रश्नांची सरबत्ती करताच महाजन यांनी आम्हाला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे, अशी सारवासारव केली.
आंतरवालीत आज मराठा समाजाची बैठक
मराठा आरक्षणासंदर्भात रविवारी सकाळी 9 वाजता आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरातून मराठा कार्यकर्ते येणार आहेत. या बैठकीत सरकारने आतापर्यंत आरक्षणासंदर्भात केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याबरोबरच आरक्षण आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.































































