
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार अशी चर्चा होती. तसा दौरा ठरवण्यात आल्याचेही बोलले जात होते. परंतू अद्याप मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतलेली नाही. त्यावरून जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना महिनाभराचा अवधी मागितला. त्यावर जरांगे यांनी जर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन शब्द दिला तर उपोषण मागे घेण्यासंदर्भात विचार करु असे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री बुधवारी जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र अद्याप मुख्यमंत्री आंतरवाली सराटी येथे पोहोचलेले नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री येणार नसल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यावरून जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
”मुख्यमंत्री येणार आहेत अशा बातम्या मी सकाळपासून ऐकतोय. मला अधिकृतपणे कळवलेले नाही. मला राजकारणातलं फार कळत नाही. अर्जुन खोतकर मुख्यमंत्र्यांना आणायला जातोय सांगून निघाले. पण अद्याप आलेले नाहीत. असं अचानक दौरा रद्द होत असेल तर माझं डोकं बंद पडायचं राहिलंय. इतकी फेकाफेकी मी बघितली नाही. राजकारणात गोम असते, हे लोक शेंगा हाणत आहेत, तरीही मुख्यमंत्री येतील असा मला विश्वास आहे”, असे जरांगे पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले.





























































