
मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच! देव आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ठणकावले. आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर अगोदर मराठ्यांचा समावेश ओबीसीत करा आणि नंतर वाट्टेल तेवढी मर्यादा वाढवा, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा समाजबांधवांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे यांच्या आज शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील सेलू तसेच सोनपेठ येथे सभा झाल्या. यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात दिलेला शब्द फिरवल्याबद्दल संताप व्यक्त केला. उपोषण सोडविताना सरकारचे मंत्री, अधिकारी चर्चा करण्यासाठी आले होते. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लिखापढी झाली आहे. कालही मंत्री तोच कागद घेऊन आले होते. त्या कागदावर जे लिहिले आहे, त्याचीच पूर्तता करा, अशी आमची मागणी आहे आणि चार शब्द आहेत त्यात तसूभरही बदल होणार नाही, असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले.
सरकारच्या हातात आणखी दोन दिवस आरक्षण मिळेल या आशेने मराठा लोक सभेला गर्दी करत आहेत. सरकारच्या नोटिशीला घाबरून ही लाट ओसरणार नाही. त्यामुळे सरकारने आता भानावर यावे, त्यांच्याकडे दोन दिवस आहेत. येत्या 48 तासांत सरकारने आरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सेलू, सोनपेठ येथील सभेत केले. आंतरवालीत शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांवर लाठीहल्ला का केला, या प्रश्नाचे उत्तर अजूनही सरकारला देता आले नाही. आता नोटिसा देऊन पुन्हा तोच प्रयोग करण्यात येत आहे. सरकारने असे धाडस करू नये, अन्यथा त्यांना राज्यात फिरणे मुश्कील होईल, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.
आज बीड येथे सभा, आंदोलनाची दिशा ठरणार मनोज जरांगे पाटील यांची शनिवार, 23 डिसेंबर रोजी बीड येथे धुळे-सोलापूर महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात दुपारी 2 वाजता ‘इशारा सभा’ होत आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून सभास्थळी जरांगे यांच्यावर 200 जेसीबींनी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सभेला येणार्या मराठा समाजबांधवांच्या मदतीसाठी एक हजार स्वयंसेवकांची फौज तैनात असणार आहे. त्याचबरोबर सभेच्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सभेला येणार्यांसाठी 300 क्विंटल तांदळाची खिचडी तसेच एकादशी असल्यामुळे 100 क्विंटल साबुदाण्याची खिचडी बनविण्यात येणार आहे.



























































