खंडणी, अपहरणप्रकरणी मनोज लोहार यांच्यासह एकाला जन्मठेप

पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार

सामना प्रतिनिधी । जळगाव

जिल्ह्यातील भडगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव महाजन यांचे 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी चाळीसगावचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ता धीरज येवले या दोघांना जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील तिसरे संशयीत तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

काँग्रसचे तत्कालीन जि.प. सदस्य डॉ. उत्तम महाजन यांनी 30 जून रोजी फॅक्स पाठवुन तत्कालीन पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी यांच्याकडे दाद मागितली होती. रस्तोगी यांनी चाळीसगावात येऊन या प्रकरणात लक्ष घातल स्वतः जबाब नोंदविले. त्यानंतर चाळीसगावचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक मनोज लोहार, तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर, धीरज येवले यांनी उत्तमराव महाजन यांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवत 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. जळगावच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान फिर्यादीसह एकूण 16 साक्षीदारांचे न्यायालयात जबाब घेण्यात आले. तत्कालीन पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी यांची साक्ष महत्वाची ठरली. या खटल्यात मनोज लोहार व धीरज सोनवणे यांना दोषी ठरविण्यात आले होते. तर विश्वासराव निंबाळकर यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध झाले नसल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या