
पालघरमधील हत्तीरोगाच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना आज पुन्हा कोंडीत पकडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी तर हत्तीरोगाचे निर्मूलन करताना आरोग्य खात्याने किती डास पकडले? त्यात नर डास किती होते, मादी डास किती होते? अशा प्रश्नांचा भडिमार करून आरोग्यमंत्र्यांना भंडावून सोडले.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विचारलेला पालघरमधील हत्तीरोगाबाबतचा प्रश्न सोमवारपर्यंत राखून ठेवला होता. आज सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात पालघरमधील प्रश्न पुकारताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱयांची संख्या, रिक्त पदांबाबत प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी 69 पदे मंजूर तर 31 पदे रिक्त असल्याची माहिती दिली तर शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी हत्तीरोगावरील बंदी घातलेल्या गोळय़ा आणि या गोळय़ांच्या मिश्रणाची माहिती मागितली व राज्यातल्या इतर जिह्यांतील हत्तीरोग व सद्यस्थितीची माहिती विचारली. या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी हत्तीरोगावर उपचार, डासांचे निर्मूलन जनजागृतीची माहिती दिली.
मी सोपे प्रश्न विचारतो
रविंद्र वायकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्र्यांनी हत्तीरोगाचा प्रसार डासांच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले. तोच धागा पकडत भुजबळ हे रवींद्र वायकर यांना म्हणाले, तुम्ही फार कठीण प्रश्न विचारता, मी सोपे प्रश्न विचारतो असे सांगत हत्तीरोगाचे निर्मूलन करताना किती डास पकडले? त्यात नर डास किती, मादी डास किती होते? कोणते डास जास्ती धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचा अहवाल आला का? त्यांच्या व्हिसेराचा अहवाल आला का, अशा प्रश्नांचा भडिमार केला तेव्हा आरोग्यमंत्री तानाजी सावंत एकदम गोंधळून गेले आणि सदस्यांमध्ये हास्याची लकेर उमटली.

























































