विधान परिषदेसाठी मुले, पाहुणे, मेहुण्यांसाठी महायुतीत लॉबिंग; देवगिरीवर सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती व इतर पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आपली मुले तसेच पाहुणे, मेहुणे आणि समर्थकांना उमेदवारी मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गर्दी दिसत आहे. नांदेड मतदारसंघाच्या जागेसाठी आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. नांदेडची विधान परिषद जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला यावी, अशी भूमिका त्यांनी मांडल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनीही देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आपला मुलगा अभिमन्यूसाठी सुनेत्रा पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केल्याचे समजते.