घरकुलांच्या ऑनलाइन यादीतून अनेकांची नावे गायब, लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न भंगणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2016 साली तयार झालेल्या ‘ड’ यादीमुळे अनेकांना हक्काचे घर मिळणार, असे निश्चित झाले होते. घरकुलाच्या ‘ड’ यादीच्या आधारावर ज्यांना घरकुले मिळणार आहेत, ती यादीदेखील ग्रामपंचायतीपर्यंत येऊन पोहोचलेली असताना, अचानक केंद्र सरकारच्या ऑनलाइन सिस्टीमअंतर्गत आधार कार्ड व जॉब कार्डच्या आधारे ऑनलाइन केलेल्या निकषातून ‘ड’ यादीतून अनेकांची नावे गायब झाल्याने अनेकांचे हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न भंगले आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गरीब, गरजू, भूमिहीन लोकांना इंदिरा आवास, प्रधानमंत्री आवास अशा विविध योजनांच्या माध्यमातून घरकुले देण्यात येतात. त्यासाठी दीड लाखापासून तीन लाखांपर्यंत अनुदान राज्य अथवा केंद्र सरकारकडून दिले जाते. सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून 2016 साली ‘ड’ यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये गरीब-गरजू कुटुंबांचा समावेश करण्यात आला. ही यादी अधिकृतरीत्या प्रसिद्धही झाली. त्यानंतर आपल्याला लवकरच हक्काचे घर मिळणार, अशी अनेकांची भावनाही निर्माण झाली. परंतु गेल्या काही दिवसांत अचानकपणे आधार कार्ड, जॉब कार्डच्या आधारावर ऑनलाइन सिस्टीमने यादीतील अनेकांची नावे गायब झाल्याचे लाभार्थ्यांसह गावपुढाऱयांच्या लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. विशेषतः या यादीतून खरोखरच अनेक गरजू गरिबांचीही नावे गायब झाल्याने या गरजूंची मात्र घोर निराशा झाली आहे. करंजी येथे जवळपास 334 लोकांचा घरकुलासाठी ‘ड’ यादीत समावेश करण्यात आलेला होता. यांपैकी 137 लाभार्थी यादीत शिल्लक राहिले आहेत. उर्वरित सर्वांची नावे या यादीतून गायब झाली आहेत.

तसेच मिरी येथील ‘ड’ यादीत 416 लाभार्थ्यांचा समावेश होता. यांपैकी 158 लाभार्थी यादीत राहिले आहेत. उर्वरित सर्व नावे हद्दपार झाली आहेत. जी नावे ‘ड’ यादीत शिल्लक राहिली आहेत, त्यांच्यासाठी 19 निकष आहेत. यामध्ये विशेषतः पक्के बांधकाम असलेले घर नसावे, घरातील कोणीही नोकरीला नसावा, संबंधितांकडे ‘किसान क्रेडिट कार्ड’ नसावे, दुचाकी अथवा चारचाकी नसावी, फ्रिज नसावा, अडीच एकरहून अधिक जमीन नसावी, घरात लॅण्डलाइन टेलिफोन नसावा, अशा स्वरूपाच्या अनेक किचकट अटी व शर्ती या निकषात लावण्यात आलेल्या आहेत.

उर्वरित लोकांच्या घरची परिस्थिती पाहण्यासाठी पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, तलाठी, सेवा संस्थेचे सचिव, अंगणवाडीसेविका, कृषी साहाय्यक यांच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून या उर्वरित लोकांची निवड ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत ऑनलाइन सिस्टीममुळे व लावलेल्या 19 निकषांमुळे अनेकांचे घरकुल मिळण्याचे स्वप्न आता स्वप्नच राहणार आहे.