मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रा विधान भवनावर धडकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठा क्रांती मोर्चाची कोअर कमिटीची बैठक 31ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाकडून उच्च न्यायालयात व सरकारकडे 15 नोव्हेंबर अखेर या मुदतीत दाखल होणार असलेल्या अहवालाबाबत तपशीलवार चर्चा करण्यात आली. मागासवर्ग आयोगाची शिफारस कोण कोणत्या स्वरूपाची असू शकेल याबाबतच्या सर्व शक्यतांवर गांभीर्यपूर्वक चर्चा करण्यात आली व त्यानंतर कोणती पावले उचलावी लागतील याबाबतही विचार मंथन झाले. तसेच मराठा क्रांती मोर्चा मधून करण्यात आलेल्या इतरही सर्व मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 15 नोव्हेंबरचा अल्टीमेटम सरकारला देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायासाठी आंदोलनाला निर्णायक व योग्य दिशा देण्याचा, आंदोलनाला स्वार्थी हेतूने फाटे फोडण्याचे सुरू असलेले काही मोजक्या लोकांचे प्रयत्न व त्याला सरकार व काही राजकारण्यांकडून खतपाणी घालण्याचे प्रयत्न उधळून लावणे बाबत सर्वंकष विचार करून काही महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले.

मराठी क्रांती ठोक मोर्चाचा ठोक मोर्चाशी काही संबंध नाही असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच हिंसा, उद्रेक व विध्वंस हे मराठा क्रांती मूक मोर्चाचे लक्ष्य नव्हते हे ही मराठा मोर्चाकडून सांगण्यात आले. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने पक्ष न काढणे, आरक्षण व इतर मागण्यांसाठी संवाद यात्रा काढणे व विधानभवनावर धडक देणे हे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. तसेच या आंदोलनात आणि संवादयात्रेत मराठी बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले.