
सामना प्रतिनिधी । नगर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला सरकारने पाने पुसली आहेत या आंदोलनाच्या दरम्यान दोन जणांचा बळी गेला याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली.
यावेळी बोलताना आखरे म्हणाले मराठा क्रांती मोर्चा त्या माध्यमातून राज्यभरामध्ये शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी आमची कायम आहे. मात्र या सरकारने तोंडाला पाने पुसली आहेत. अनेक समित्या आणि आयोग गठीत केले पण त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोणताच निर्णय न घेतल्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला यामध्ये काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनवणे यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना पाहता याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहे त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार असल्याचेही आखरे यांनी यावेळी सांगितले राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्री पद आहे.
राज्यातील हे खाते सांभाळण्यास सपशेल अपयशी ठरले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर पंढरपूरमध्ये आम्ही पाऊल ठेऊ देणार नाही असे वक्तव्य केल्यावर यांच्या डोक्यातून एक शक्कल लढली गेली की आम्ही त्या ठिकाणी साप सोडणार आहोत. पण आम्ही त्यातले नाही आम्ही वारकरी आहोत आम्हाला यांच्याबद्दल रास्त अभिमान आहे. मात्र मुख्यमंत्री तसेच संघाच्या माध्यमातून असा विषय घेतला गेला व त्यांच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना काढली गेली ती साप ही त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले ते या ठिकाणी आलेले आहे. आमचे म्हणणे असे आहे की, मुख्यमंत्र्यांनी गुप्त अहवाल कुणी कसा दिला याचा खुलासा केला पाहिजे. गुप्त अहवाल फुटला कसा असाही प्रश्न आम्हाला आहे. मुख्यमंत्र्यांनी याचाही खुलासा तात्काळ करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केले आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आगामी काळामध्ये वाढत जाणार असून दिनांक १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती पासून आंदोलन छेडले जाणार आहे असेही आखरे यांनी यावेळी स्पष्ट केले.



























































