
मराठा समाजाला शिक्षण व नोकरी आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत सरकार उद्या मंगळवारी सभागृहात प्रस्ताव मांडून आपली भूमिका मांडणार आहे. त्यावेळी या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल. सर्व सदस्यांना बोलू दिले जाईल. मात्र, आज अधिवेशनाचा पहिला दिवस असल्यामुळे इतर कामकाज होऊ द्या, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले असतानाही विरोधकांनी ‘‘आम्हाला या विषयांवर बोलू द्या’’ अशी मागणी करत सरकारविरोधात सभागृहात घोषणाबाजी केली आणि गोंधळ घातला. त्यामुळे सभापतींनी सभागृह दोनवेळा तहकूब केले.
पुण्यातील स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. एमपीएससी परीक्षा पास होऊनही स्वप्नील याला नोकरी मिळाली नाही. एमपीएससी परीक्षा, निकाल आणि नियुक्त्या दीड वर्ष स्थगित आहेत. त्यामुळे ही परीक्षा दिलेल्या आणि देऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. एमपीएससीचे सदस्य अजूनही नेमलेले नाही. स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांचा आधार गेला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत द्यावी आणि एमपीएससीबाबत भूमिका सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
























































