
सामना प्रतिनिधी। नांदेड
मराठा समाजाला तत्काळ आरक्षण मिळावे या मागणीसाठी छत्रपती शिवाजी चौक, मालेगाव तालुका अर्धापुर येथे रास्ता रोको आंदोलन शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
मालेगाव ता. अर्धापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रं.२२२ वर तीन तास रस्तारोको आंदोलन मराठा समाजबांधवांनी केले. यावेळी सर्वप्रथम मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांना श्रध्दांजली देऊन रस्तारोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी सांगण्यात आले की, राज्यभर मराठा आंदोलनाचे तीव्र आणि हिंसक पडसाद उमटत असून अर्धापूर तालुक्यातही आता अधिक आक्रमक , तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील, त्याचं बरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ न सुटल्यास मराठा आमदार , खासदार , मंत्र्यांनाही चांगलाच धडा शिकवण्यात येणार असून त्यांना गावबंदी करण्याचा संकल्पही युवकांनी केला.मराठा समाजासाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रामाणिक काम केले.
या आंदोलनात मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.



























































