हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाडाचे कारण देत अजित पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द, विरोधाच्या धास्तीमुळे दौरा रद्द केल्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे 43 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. याशिवाय पवार यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अन्यही कार्यक्रम होते. मात्र अजित पवार यांचा हा दौरा शनिवारी सकाळी रद्द करण्यात आला. मराठा समाजाने अजित पवार यांच्या या दौऱ्याला विरोध केला होता. अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र मराठा समाजाकडून होमारा विरोध लक्षात घेता त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची कुजबूज सुरू आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण, आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगीत,जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील कोलते पिंपळगावमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमध्ये त्यांच्या सभा होणार आहे. एकीकडे या सभा होत असताना दुसरीकडे अजित पवारांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. मराठा समाजाने या दौऱ्याला विरोध करण्याची भूमिका घेतली होती. मनोज जरांगे आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यातील शाब्दीक संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे. भुजबळांवर मराठा समाज नाराज असून या नाराजीचा फटका अजित पवारांनाही बसल्याचे सांगण्यात येत आहे.