
संजय मिस्त्री । संभाजीनगर
वाळूज औद्योगिक वसाहतीतील बंदमध्ये सहभागी असलेल्या तब्बल २० ते २५ स्थानिक व बहुराष्ट्रीय कंपन्यांवर मराठा आंदोलनात शिरलेल्या अज्ञात समाजकंटकांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे मराठवाड्यातील उद्योग जगत हादरून गेले आहे. राज्यभर शांततेत झालेल्या मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आंदोलनाशी संबंध नसलेल्या टोळीने पद्धतशीर कट रचून चाकणप्रमाणेच वाळूजमध्ये हिंसाचार घडवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी देखील वाळूजमधील हिंसक घटनांशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षण आंदोलन शांततेत मात्र आक्रमकपणे करायचे, कसलाही हिंसाचार होऊ द्यायचा नाही, आंदोलनात शिरणाऱ्या बाहेरच्या घटकांना वेळीच रोखायचे अशी खबरदारी घेऊनच आयोजकांनी आंदोलनाला सुरुवात केली. चाकनचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय शांततेत आणि शिस्तबध्दपणे हे आंदोलन झाले. आंदोलनासाठी जाहीर केलेल्या प्रत्येक आंदोलनस्थळी सायंकाळपर्यंत अतिशय शांततेत हे आंदोलन सुरू होते. शहरवासीयांनी आणि उद्योजकांनीही उत्स्फुर्तपणे बंद पाळून या आंदोलनाला पाठिंबाच दिलेला होता. त्यामुळे महत्त्वाच्या आंदोलनात शिरकाव करता न आलेल्या अज्ञात समाजकंटकांच्या टोळीने अचानकपणे कुणालाही अपेक्षित नसलेल्या वाळूज एमआयडीसीकडे आपला मोर्चा वळवला आणि औद्योगिक वसाहतीत धुडगुस घातला.
दहशतीचा अतिरेक
साधारणत: दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीत ही टोळी शिरली. साधारणत: पाचशेच्या आसपास असलेल्या या कथित टोळक्यांमध्ये स्थानिक आंदोलकांपैकी कुणीही नव्हते. स्थानिक आंदोलकांच्या परिचयाचे नसलेले, आंदोलनाची कसलीही शिस्त नसलेले हे टोळके रांगेने एकेक कंपनी टार्गेट करीत पुढे सरकत होते. मराठा आंदोलनामुळे व्यवस्थापनाने बंद ठेवलेल्या तब्बल २० ते २५ कंपन्यांची रांगच त्यांनी उद्ध्वस्त केली. ज्या कंपनीत कोणतेही उत्पादन सुरू नव्हते, कामगार नव्हते. गेटवर केवळ सुरक्षा रक्षकच होते अशा कंपन्यांमध्ये घुसून सुरक्षा रक्षकांच्या केबीनची फोडतोड करणे, कंपनीच्या दर्शनी इमारतीच्या भागात घुसून तेथे दिसेल ते उचलून फेकणे, कंपनीत कामगारांची नेआण करणारी वाहने, कंपनीत बंद अवस्थेत उभी असलेली दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहने मिळतील त्या दगड धोंड्यांनी त्यांनी तोडफोड केली. त्यांचे हे काम जवळपास तीन ते साडेतीन तास सुरू होते. पोलीस आणि एसआरपी पोहोचले तेव्हा या जमावावर नियंत्रण मिळवणे सुरू झाले.
आंदोलक असे करु शकतात काय?
विशेष म्हणजे या टोळक्यांनी विध्वंस करताना आकार टूल्समधील रामाचे काचेचे मंदिरही फोडून टाकले. कामगारांसाठी गेल्याच वर्षी व्यवस्थापनाने विकत घेतलेली अॅम्बुलन्सही फोडली. आकार, व्हेरॉक, बीएसएनएल, स्टरलाईट, सिमेन्स, एन्ड्युरन्स ते मायलॉन अशा एकेक कंपन्या फोडत या जमावाने २० ते २५ कंपन्यांची पूर्ण रांगच उद्ध्वस्त केली. एमआयडीसीमध्ये यामुळे अतिशय दहशतीचे वातावरण निर्माण झाले. दुपारी उशिरा घटनास्थळी एसआरपी पोहोचली. विशेष म्हणजे मराठा आंदोलनाला सक्रीय पाठिंबा असलेल्या किरण शेटे यांची युनायटेड जनसेट प्रा. लि. कंपनीही याच रांगेत होती. तिचेही टोळक्याने चांगलेच नुकसान केले. मराठा आंदोलनामुळे रस्ते बंद झालेले असल्याने त्यांना आपल्या कंपनीतही जाता आले नाही.
उद्योग क्षेत्रासाठी वाईट संदेश
वाळूज एमआयडीसीतील या घटनेविषयी सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले म्हणाले, नक्की काय घडले, किती नुकसान झाले याचा अद्याप अंदाज येत नसला तरी स्टरलाईट ते मायलॉन अशा उद्योगांची रांगच अज्ञात समाजकंटकांनी उद्ध्वस्त केली आहे. राज्याच्या उद्योगावरच हा घाला आहे. ही अतिशय वाईट अशी गोष्ट आहे. तर सीएमआयएचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ म्हणाले, उद्योग क्षेत्र संकटात आहे, उद्योजकांचे मनोधैर्य खच्ची झाले आहे. आम्ही कर भरतो, समाजसेवेतही अग्रेसर असतो, मग आम्हालाच टार्गेट का केले जाते? बंदमुळे नुकसान तर होतेच शिवाय दहशत, मारझोड, मोडतोड यामुळे येणाऱ्या उद्योगांच्या मनात कायमचाच नकारात्मक परिणाम होणार आहे. मराठवाड्यातील उद्योजकांनाही आता महाराष्ट्रात रहावे की नाही, असा प्रश्न पडला आहे.
मराठी हातांना काम हवे!
भारतीय कामगार सेनेचे चिटणीस प्रभाकर मते यांनी वाळूजमधील अज्ञात समाजकंटकांच्या दहशतीचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले, मराठवाड्यात उद्योग आणायचे आहेत. येथील उद्योगांचा विस्तार करायचा आहे. खरे आंदोलक कधीही रामाचे मंदिर फोडणार नाहीत. हा काहीतरी बाहेरचा आणि संशयास्पद प्रकार आहे. असे प्रकार जे कुणी करीत असतील, त्यांचा सखोल शोध घेणे गरजेचे आहे. मराठा आंदोलन हे न्याय्य हक्कासाठी आहे, कंपन्या बंद पडल्या तर न्याय मागणाऱ्या, आरक्षण मागणाऱ्या तरुणांच्या हाताला काम कसे मिळेल? त्यामुळे आंदोलक असा प्रकार करूच शकत नाहीत.
संबंध नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे स्पष्टीकरण
वाळूजमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेशी मराठा क्रांती मोर्चाचा काही एक संबंध नाही, असे स्पष्टीकरण मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चंद्रकांत भराड, सुरेश वाकडे व राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ हाक देण्यात आली होती. बंद शांततेत आणि अहिंसक मार्गाने सुरू असतानाच वाळूज औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनेचा संबध थेट मराठा क्रांती मोर्चाच्याशी जोडला जात असल्याबद्दल समन्वयकांशी संपर्क साधला असता त्यांनी वाळूजच्या हिंसाचाराच्या घटनेशी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. ज्यांनी कंपन्यात शिरुन नुकसान केलेले आहे त्यांना कंपनीतील अंतर्गत रचनेची अतिशय बारकाईने माहिती असावी असे दिसते. आंदोलकांना असे अंतर्गत रस्ते माहिती असण्याचे काही कारण नाही.
उद्योक संघटनांची पत्रकार परिषद
वाळूजमध्ये समाजकंटकांद्वारे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्यानंतर येथील उद्योगसमुहाने तातडीने पत्रकार परिषद घेतली. सरकार आम्हाला संरक्षण पुरवणार की नाही असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. तसेच या हिंसाचारात एमआयडीसीतील ६० मोठ्या कंपन्या आणि २० छोड्या कंपन्यांचे नुकसान झाले असून या संबंधी उद्योग समुहाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे नुकसान झालेल्या बहुतांश कंपन्या या मल्टिनॅशन कंपन्या होत्या आणि काही कंपन्यांमध्ये फॉरेनची लोक व्हिजीटसाठी संभाजीनगरात आलेली होती. त्यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडल्याने बाहेरची गुंतवणूक होणार कशी, असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

























































