प्रतीक्षा वटहुकुमावरील स्वाक्षरीची, वैद्यकीय विद्यार्थ्यांचे 13व्या दिवशीही आंदोलन सुरूच

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्य सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश कायम करण्यासाठी वटहुकूम काढला. हा वटहुकूम राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला आहे. वटहुकुमावर स्वाक्षरी झाल्यानंतरच सरकार त्याची अधिसूचना काढणार आहे. त्यानंतरच सीईटीच्या वेबसाइटवर अधिसूचना पडणार असून त्याच्याच प्रतीक्षेत मराठा विद्यार्थी असून सलग 13 व्या दिवशी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे.

विद्यार्थ्यांनी आजही आझाद मैदानात ठिय्या सुरूच ठेवला. राज्य सरकारने वटहुकूम काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मात्र प्रत्यक्षात हाती नोटीस लागत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया मराठा विद्यार्थी सुयश पाटील यांनी दिली. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले असले तरी आमचा लढा योग्य दिशेने सुरू आहे. सरकारने हा वटहुकूम काढण्यात योग्य ती दक्षता घेतली असल्यास तो निश्चितच न्यायालयातही टिकेल, अशी आशा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचेही आंदोलन
मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न अद्याप निकाली निघाला नाही तोच सरकारने काढलेल्या वटहुकुमावरून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. राज्यपालांनी वटहुकुमावर स्वाक्षरी करू नये यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आज कार्टर रोडवर धरणे आंदोलन केले. त्याचप्रमाणे ऍड. गुणवंत सदावर्ते यांनी राज्यपालांना वटहुकुमावर स्वाक्षरी न करण्याचे पत्रही पाठवले.