
अभिनेता आशीर्वाद मराठे सांगत आहे, स्वतःच्या आयुष्याची प्रयोगशील नाटय़कथा…
पैसा तुम्हाला जगवू शकतो, पण तुम्ही कसे जगायचे हे नाटकच शिकवते, यावर माझा ठाम विश्वास आहे.
माझ्या जीवनात ‘नाटक’ ही गोष्ट आमूलाग्र बदल घडवणारी ठरली आहे. माझे संपूर्ण कुटुंब नाटकवेडे आहे. महाडसारख्या ठिकाणी राहूनही सातत्याने एकांकिका स्पर्धा, राज्य नाटय़ स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा आम्ही करत राहिलो. यश-अपयश पचवत राहिलो. ‘नाटय़क्षेत्राच्या या आवडीवर आतापर्यंत केलेल्या खर्चाची मोजदाद केली, तर मुंबईत पेडर रोडला आलिशान फ्लॅट घेतला असता,’ असे गंमतीत आमचे स्नेही म्हणतात. अर्थात आम्हाला याची अजिबात खंत नाही, कारण नाटक करून आम्हाला मिळालेला आनंद कुठल्याच पैशात मोजता येणार नाही. काटकसरीने वागत, पण व्यवस्थित नियोजन करून अंथरुण पाहून पाय पसरायचे, या माझ्या वडिलांनी लहानपणापासून दिलेल्या संस्कारामुळे मी स्वतः आणि अतिशय कष्टात बालपण गेल्यामुळे एपंदर नियोजनाची जाणीव असणारी माझी पत्नी मानसी आम्ही शून्यातून सुरुवात करून आज जीवनात स्थिरस्थावर झालो आहोत.
एका सरळ रेषेत सुरू असलेल्या माझ्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली ती माझी पत्नी मानसी माझ्या आयुष्यात आल्यानंतर! माझे कुटुंब मध्यमवर्गीय. नियोजनबद्ध काटकसर करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या वडिलांना गाण्याची प्रचंड आवड होती. ते स्वतः उत्तम गायक होते. आई लेखिका, कवयित्री होती आणि दोन्ही बहिणींनाही अभिनयाची आवड, त्यामुळे साहजिकच लहानपणापासून कलाक्षेत्र आमच्या घरात होतेच. मी अगदी शालेय जीवनापासून स्टेजवर काम करत होतो. वडील निवृत्त झाल्यानंतर आमच्या मूळ गावी म्हणजे नागाव, अलिबागला स्थायिक झाले.
मी मात्र शालेय जीवनापासून महाडमध्ये असल्याने तिथेच राहिलो. तिथे ‘रातराणी’ नाटकाच्या निमित्ताने एक ‘डॅशिंग’ मुलगी माझ्या आयुष्यात आली. रंगमंचावर एकत्र आलेलो आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि दोघांच्या घरून संमती मिळाल्याने माझा मानसीसोबतचा आंतरजातीय विवाह पार पडला. आमचा मुलगा अभिषेक याच्या जन्मानंतर खऱ्या अर्थाने आमच्या जीवनात आर्थिक बदल होऊ लागला. हे सर्व करत असतानाच नाटकसुद्धा सुरू होतेच. अगदी मानसीने गरोदर असतानाही एकपात्री अभिनय स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामुळे साहजिकच अभिषेकला नाटकाचे बाळकडू मिळाले.
अलीकडच्या काही काळात माझ्या आयुष्यात आलेली दुसरी कलाटणी म्हणजे अभिषेकने व्हॉट्सअॅपवर निर्माण केलेला ‘मराठी नाटक समूह’ हा ग्रुप! नाटय़क्षेत्रातल्या प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी, पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासारख्या अनेक नावाजलेल्या व्यक्तींशी कुठलीही थेट ओळख नसताना संदेश पाठवून, केवळ आणि केवळ नाटक या विषयाचाच एक समूह त्याने तयार केला. त्याचा हा प्रामाणिक प्रयत्न नाटय़कर्मींना खूप भावला. आज आमचा हा समूह मोठा होतोय. नाटय़क्षेत्राशी संबंधित अनेक रंगकर्मी या समूहात सामावलेले आहेत. प्रायोगिक नाटय़ महोत्सव, नाटय़ लेखन स्पर्धा, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पडद्यामागच्या कलाकारांना केलेली आर्थिक मदत, यांसारख्या नियोजनबद्ध उपक्रमांमुळे ‘मराठी नाटक समूह’ हा मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या रंगकर्मींना जवळचा वाटतो.
‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ हे नाटक आमच्याच नाटय़ लेखन स्पर्धेतून व्यावसायिक रंगभूमीवर आलेले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीला ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी परीक्षक होते. मराठी नाटक समूहाच्या उपक्रमातून आलेले म्हणून हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणतोय, अशी त्यांनी बातमी देतानाच, ‘या नाटकातील एक व्यक्तिरेखा तू कर,’ म्हणून त्यांनी मला विचारणाही केली, पण त्या वेळी आमचे ‘आय विटनेस’ हे हौशी नाटय़ स्पर्धेचे नाटक आठ दिवसांवर आले होते, त्यामुळे मला ‘नाही’ म्हणावे लागले. मन खट्टू झाले होते. व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण करण्याची संधी चालून आली असताना आणि ‘जिगीषा’, ‘अष्टविनायक’ या नामांकित संस्थांना तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्दर्शकाला ‘नाही’ सांगणे म्हणजे मूर्खपणा आहे असेही वाटत होते, पण ‘हौशी नाटय़ स्पर्धेचे असले म्हणून काय झाले, ‘हाती असलेले नाटक आधी कर, नंतर पुढे बघू,’ असे खुद्द चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितल्यानंतर मला बरे वाटले. पुढे ‘संज्याछाया’ या नाटकात त्यांनी मला दिलेल्या भूमिकेमुळे हौशी असलेला मी आता व्यावसायिक कलाकार या विभागात येऊन पोहोचलो आहे.
माझ्या एकूणच जीवनाबद्दल सांगायचे तर मी ज्या गोष्टी केल्या त्या प्रामाणिकपणे आणि सचोटीने! आपल्या स्वभावामुळे किंवा शब्दांमुळे कुणी दुखावणार नाही याची आणि कटू प्रसंग येणार नाहीत याची नेहमी काळजी घेतली. व्यवसाय असो किंवा रंगभूमी सगळय़ावर कायम विश्वास ठेवला. या प्रवासात अनेक अडचणीही आल्या, पण त्या सर्वांशी लढण्याची ताकद मात्र ‘नाटक’ या कलेने दिली.
>> शब्दांकन – राज चिंचणकर






















































