
मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे (78) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच रवींद्र बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणले होते. मात्र अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांचे सख्खे भाऊ होते. दरम्यान, बुधवारी सकाळी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी बेर्डे कुटुंबीयांसह चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.
तब्बल 300हून अधिक चित्रपटांत काम करणारे रवींद्र बेर्डे हे आजारपणामुळे गेल्या काही वर्षांपासून अभिनयापासून दूर होते. रवींद्र बेर्डे यांना 1995 मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर 2011पासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते. नाटकाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कर्करोगाने त्रस्त असूनही ते नाटक पाहायला जात असत.
अशी जुळली अभिनयाशी नाळ
वयाच्या विसाव्या वर्षी रवींद्र बेर्डे नभोवाणीशी जोडले गेले होते. 1965 साली ते आकाशवाणीच्या नभोनाटय़ांचे दिग्दर्शन करत होते. इथूनच त्यांचा नाटय़सृष्टीशी संबंध जुळला. त्यानंतर 1987 साली त्यांना नाटकातून अभिनयाची संधी मिळाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 31 नाटकांतून काम केले.
300हून अधिक चित्रपटांत भूमिका
नाटकानंतर पुढे ते चित्रपटातूनदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारू लागले. सुरुवातीला खलनायकी आणि नंतर विनोदी व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या. चंगू-मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा यांसारख्या 300हून अधिक मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली. सिंघम, चिंगीसारख्या हिंदी सिनेमांत रवींद्र बेर्डे यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच गाजली.
























































