
मराठी भाषेला समृद्ध नाट्यपरंपरा आहे. सिनेमा, ओटीटी, मालिका अशा माध्यमप्रकारांच्या आगमनानंतरही नाटकाने आपला प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवला आहे. आजही नाट्यगृहांबाहेर हाउसफुल्लचे बोर्ड झळकलेले दिसतात. पण, त्याच नाट्यगृहांतील प्रचंड गैरसोयी आणि त्याबद्दल असलेली प्रशासकीय, राजकीय अनास्था याबाबत अनेकदा संताप व्यक्त केला जातो. अभिनेता वैभव मांगले यांनीही त्यांना आलेला एक संतापजनक अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे.
सध्या वैभव ‘संज्या-छाया’ या नाटकामध्ये काम करत आहेत. पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक याठिकाणी नाटकाचे प्रयोग सुरू असताना आलेल्या अनुभवांबाबत त्यांनी परखडपणे आपल्या पोस्टमध्ये मांडलं आहे. वातानुकूलित यंत्रणा नसलेल्या नाट्यगृहांमध्ये भर उकाड्यामध्ये ‘संज्या-छाया’च्या संपूर्ण टीमला नाटकाचा प्रयोग करावा लागला. याबाबत वैभव म्हणाले, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग ‘संज्या छाया’चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व, पुणे – खूप डास आणि उकाडा, कोथरूड, यशवंतराव- उकाडा) प्रयोग पाहत होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का? याचा विचार करू लागले. पण आपण ‘शो मस्ट गो ऑन’वाले लोक. आम्ही विनंती केली की, आम्हालाही त्रास होतच आहे. इथे येई पर्यंत माहीत नव्हतं की, एसी नाही. आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी 17 आणि 27चे शो रद्द केले. त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय. कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी? विचारलं तर सांगतात एसी चालू आहे पण खूप गर्मी असल्याने एसी यंत्रणा नीट काम करत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. या सगळ्यावर काय बोलावं?” प्रचंड उकाड्याचा त्रास कलाकारांसह नाट्यरसिकांनाही सहन करावा लागला, असं मांगले यांनी आपल्या पोस्टमधून म्हटलं आहे.































































