
जुहू येथील जेव्हीपीडी जंक्शन जवळ किरकोळ वादातून अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री निवेदिता सराफ या विलेपार्ले येथून घरी परतत होत्या. यावेळी रात्री 10:30 च्या सुमारास जुहूच्या जेव्हीपीडी सिग्नलवर MH-15-BD-9945 या सेडान कार चालकाने सराफ यांच्या गाडीला मागून धडक दिली.
यावेळी सराफ यांचा ड्रायव्हर अजय ठाकूर (38) हा गाडीला झालेले नुकसान पाहण्यासाठी गाडीच्या खाली उतरला. यावेळी मागून गाडी ठोकणाऱ्याने अजय ठाकूरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करणाऱ्याने निवेदिता सराफ यांना गाडीची काच खाली कर, म्हणूनही धमकावलं होतं. यावेळी अजय याने मारहाण करणाऱ्याला, पोलिसांना बोलावतो असते सांगताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पळून जात असताना त्याने एका बेस्ट चालकाला देखील शिवीगाळ केली.
या घटने संदर्भात निवेदिता सराफ यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सराफ यांच्या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी या नाशिक नोंदणीकृत गाडीचा तपशील मागवला आहे. संबंधित व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच पोलिसांनी या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेजही मागवले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून संबंधित कार चालकावर कारवाई करण्यात येणार आहे.

























































