
नव्वदहून अधिक मराठी चित्रपट आणि साठ पेक्षा अधिक नाटकांत भूमिका साकारलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुखटणकर (84) यांचे निधन झाले. मूळ गाव रुई, ता. हातकणंगले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रुई येथील न्यू भारत नाट्य क्लबच्या माध्यमातून त्यांना नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रभर नाटकाचे दौरे केले होते. त्याकाळी नर्तकी या त्यांच्या नाटकाचे 300 हून अधिक प्रयोग झाले होते. मराठी चित्रपटांत चरित्र्य अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केले.
वेगळं व्हायचय मला, मुंबईची माणसं, प्रेम तुझा रंग कसा अश्या अनेक नाटकात भूमिका साकारल्या. बाई मी भोळी, कुंकवाचा करंडा, जोतिबाचा नवस,सून लाडकी या घरची, कौल दे खंडेराया, एकटा जीव सदाशिव, सोयरिक, अष्टविनायक, भिंगरी, सावज, सहकार सम्राट, भुजंग, तोतया आमदार, धुमधडका, लेक चालली सासरला, कुलस्वामिनी अंबाबाई, इरसाल कार्टी, दे दणादण, बळी राज्याचे राज्य येऊ दे अश्या अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला होता.धनगरवाडा हा त्यांनी शेवटचा चित्रपट केला होता. तसेच अमृतवेल आणि तुझ्यात जीव रंगला या मालिकांमध्येही काम केले होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने त्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना 2006 साली चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तर त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सलाम म्हणुन भालकर्स कला अकादमीने 2015 मध्ये त्यांना “चित्रसेवा पुरस्कारा”ने सन्मानित केले होते. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, निनाद काळे, मिलिंद अष्टेकर,राजू राऊत, संग्राम भालकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
























































