मुंबई विद्यापीठात मराठी शब्दांचा संग्रह विकसित, उपयोजित मानसशास्त्र विभागाचा उपक्रम

मुंबई विद्यापीठातील उपयोजित मानसशास्त्र विभागाने मराठी भाषेचे कॉर्पस विकसित केले आहे. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून हे कॉर्पस प्रदर्शित करण्यात आले आहे. विभागातील प्राध्यापक डॉ. विवेक बेल्हेकर आणि त्यांच्या संशोधन चमूने संस्कृती, भाषा आणि व्यक्तिमत्त्व या विषयावर संशोधन करून हा कॉर्पस विकसित केला आहे. कॉर्पस म्हणजे एखाद्या विषयाच्या लिखाणातील जवळपास सर्व शब्दांचा संग्रह. शब्द मोजणी कॉर्पसमध्ये प्रत्येक शब्द किती वेळा वापरला आहे याची माहिती असते.

मुंबई विद्यापीठात विकसित केलेल्या मराठी भाषेच्या कॉर्पसमध्ये प्रत्येक शब्दाचा वापर प्रत्येक दशकात किती वेळा होतो याची माहिती आहे. यासाठीचे ऑप्लिकेशन डॉ. विवेक बेल्हेकर आणि राधिका भार्गव यांनी विकसित केले असून त्यातून उपलब्ध शब्दाची माहिती आलेखाच्या स्वरूपात प्राप्त होते. मराठी ही देशातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱया भाषांपैकी आहे. मराठी भाषेचे 83 दशलक्षाहून अधिक भाषिक आहेत. मराठी आणि हिंदीच्या मानस-भाषिक अभ्यासासाठी डॉ. बेल्हेकर आणि राधिका भार्गव यांनी मराठी आणि हिंदी कॉर्पस विकसित केला आहे. या संदर्भातील अधिक काम मुंबई विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागात सुरू असून लवकरच अधिक उपयोगी भाषिक विश्लेषणाची साधने संशोधक आणि सर्वसामान्याना उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.