
94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त नाशिकच्या कविवर्य कुसुमाग्रजनगरीत प्रथमच बालसाहित्य मेळावा होत आहे. यामुळे बालसाहित्य विश्वाला अधिक बळकटी मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर नाशिक जिल्हा स्थापनेला 151 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्हा विशेष परिसंवादही होणार आहे. त्यात जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्पावर प्रकाशझोत टाकला जाईल.
आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीत हे संमेलन 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. त्यात बालसाहित्य मेळावा प्रथमच होत आहे. 4 डिसेंबरला सकाळी या मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होईल. यात सूर्यकांत मालुसरे, पृथ्वीराज तौर, संजय पेंडसे, आश्लेषा महाजन, विनोद सिंदकर, किरण भावसार, संदीप देशपांडे, संजय वाघ, प्रशांत गौतम, संतोष हुदलीकर सहभाग घेतील.
संमेलनाच्या पूर्वसंध्येला 2 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल, तसेच 4 डिसेंबरला आणि समारोपाच्या दिवशी सायंकाळी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी 3 डिसेंबरला सकाळी 8.30 वाजता कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज प्रतिष्ठान ते निमाणी बसस्थानकापर्यंत ग्रंथदिंडी काढली जाईल. नंतर बसने आडगावला कविवर्य कुसुमाग्रज नगरीत दाखल झाल्यानंतर प्रवेशद्वार ते संमेलनस्थळ अशी पुन्हा ग्रंथदिंडी राहील. सकाळी 11 वाजता ध्वजारोहण, दुपारी 4 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचा शुभारंभ होईल. त्यानंतर मुख्य उद्घाटन सोहळ्यात स्वागताध्यक्ष, पालकमंत्री छगन भुजबळ, उद्घाटक, तसेच 93व्या संमेलनाचे अध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची भाषणे होतील. रात्री 9 वाजता कवी संमेलन श्रीधर नांदेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात महाराष्ट्रासह भोपाळ, गोवा, गुजरात राज्यातील कवी देखील सहभागी होतील.
दुसर्या दिवशी शनिवारी सकाळी ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांची मुलाखत डॉ. चंद्रकांत पाटील, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर घेतील. ज्येष्ठ लेखक मनोहर शहाणे व ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सत्कार संमेलनाध्यक्षांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर डॉ. नारळीकर यांचे कथावाचन होईल. पुढे ‘लक्ष्यवेधी कवींशी संवाद’ कार्यक्रमात प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम, सुचित्रा बल्लाळ, वैभव जोशी सहभाग घेतील. दुपारच्या सत्रात ‘स्मृतिचित्रे- लक्ष्मीबाई टिळक’ या परिचर्चेत प्रा. एकनाथ पगार, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, रेखा इमानदार-साने, गजानन जाधव, मोना चिमोटे यांचा सहभाग राहील. कथाकथन विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यात गिरीष देसाई, विद्याधर बनसोड, बाबासाहेब परीट, राजेंद्र गहाळ कथा सादर करतील. संमेलनाचा समारोप 5 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता होईल.
नाशिककरांचे कला, पुस्तक प्रदर्शन
नाशिक येथील स्थानिक शिल्पकार, चित्रकार यांचे वैशिष्टय़पूर्ण असे कलाप्रदर्शन संमेलनाच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. त्याचबरोबर नाशिककर लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शनही भरवले जाणार आहे.
कवीकट्टा 48 तास रंगणार; 700 कवींचा सहभाग
या संमेलनात कवीकट्टा हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. सलग दोन रात्र काव्यवाचन सुरू राहणार असून, यात राज्यातील 700 कवी आपल्या रचना सादर करतील. याचे संयोजन राजन लाखे, संदीप देशपांडे आणि संतोष वाटपाडे करणार आहेत.
हे आहेत परिसंवाद
4 आणि 5 डिसेंबरला मिळून एकूण सहा परिसंवाद होतील. शनिवारी सायंकाळी ‘कोरोनानंतरचे अर्थकारण आणि मराठी साहित्य व्यवहार’ या परिसंवादाचे अध्यक्षस्थान जयदेव डोळे भूषवतील. यात मकरंद कुलकर्णी, डॉ. आशुतोष रारावीकर, विनायक गोविलकर, हंसराज जाधव, दीपक करंजीकर, सहभाग घेतील. ‘गोदातिरीच्या संतांचे योगदान’ हा परिसंवाद रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. धनश्री लेले, विवेक अलोणी, चारुदत्त आफळे, दत्तात्रय घुमरे, गीता काटे, बिषप थॉमस डाबरे निमंत्रित असतील.
रविवारी सकाळी ‘मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दोन पाऊले मागे’ याचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी शफाअत खान असून, नाट्य निर्मात्या लता नार्वेकर, पराग घोंगे, सतिश साळुंके, अभिनेते सुबोध भावे, नाटककार प्राजक्त देशमुख निमंत्रित आहेत. सकाळीच ‘शेतकर्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्ताचा निर्दयपणा, लेखक-कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका’ हा परिसंवाद ज्येष्ठ लेखक भास्कर चंदनशीव यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यात मंत्री बच्चू कडू, रमेश जाधव, मिलिंद मुरूगकर, संजय आवटे सहभाग घेतील. दुपारी ‘ऑनलाईन वाचन : वाङ्मय विकासाला तारक की मारक?’ परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ. दिलीप धोंडगे भूषवणार आहेत. यात वक्ते श्रुतीश्री वडगबाळकर, धनंजय गांगड, श्रीमंत माने, विलास साळुंके, मयूर देवकर असणार आहेत. दुपारीच ‘साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड’ या परिसंवादात अध्यक्षा नीलिमा गुंडी, ऋषाली देशपांडे, डॉ. भगवान कारे, वृंदा भार्गवे, इम्राहीन अफगाण, भास्कर डोखे सहभाग नोंदवतील.































































