मराठवाड्यात परतीच्या पावसाने हाहाकार, 29 लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल

549

परतीच्या पावसाने मराठवाडय़ात हाहाकार माजवला असून 29 लाख 57 हजार हेक्टरवरील खरीप पिकांचा या पावसामुळे अक्षरशः चिखल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापसाची माती झाल्याने साडेआठ हजार गावांतील जवळपास 30 लाख शेतकऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. महसूल विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत हे विदारक सत्य समोर आले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून मराठवाडय़ातील शेतकरी कोरडय़ा दुष्काळाशी सामना करताना मेटाकुटीला आला आहे. आता परतीच्या पावसाने शेतकऱयांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पावसाळा संपल्यानंतर झालेल्या या पावसाने शेतशिवारावर मरणकळा आणली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत परतीच्या पावसाने धुमशान घालून शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या पावसाने मराठवाडय़ातील तब्बल 29 लाख 57 हजार 500 हेक्टरवरील खरीप पिकांचा चिखल झाला आहे. यात 12 लाख 28 हजार 940 हेक्टरवरील सोयाबीनची पुरती नासाडी झाली असून 11 लाख 44 हजार 429 हेक्टरवरील कापूस सडला आहे. काढणी झालेल्या मका, बाजरीच्या कणसांना जागेवरच कोंभ फुटले आहेत. या अस्मानी संकटामुळे मराठवाडय़ाच्या 8450 गावांतील 30 लाख 25 हजार शेतकऱयांवर उपासमारीची वेळ ओढवल्याचे महसूल विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत समोर आले आहे.

परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान बीड जिल्हय़ात झाले आहे. त्यापाठोपाठ संभाजीनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशीव जिल्हय़ात पावसाने धुमशान घातले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी बीड जिल्हा पावसाच्या थेंबासाठी आसुसला होता. पाऊसच नसल्यामुळे बीड जिल्हय़ात वर्षभरात हजारापेक्षा जास्त शेतकऱयांनी आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या