
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील नेत शेतशिवारात मोठा कोंबड बाजार भरत असून याठिकाणी लागणाऱ्या कोंबड्याच्या झुंजीवर लाखो रुपयांचा जुगार दररोज चालत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. याठिकाणी कोंबड्याच्या झुंजी लावण्यासाठी मोठी जत्राच भरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत असून या अवैध धंद्याकडे मारेगाव पोलिसांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहे.
कोंबड बाजारावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा बंदी घातली आहे. तरी सुद्धा अवैधपणे हे सर्रास चालू आहेत. सध्या शेतकऱ्यांना खरीप पिकांचे पैसे मिळत आहेत. नेमके याच वेळीस जिल्ह्यात कोंबडं बाजारला उत येतो. यातून बिनसयास पैसे मिळविण्याच्या हव्यासापायी शेतकरी कोंबडीच्या झुंझीवर पैसे लावतात. यामध्ये कधी शेतकरी खरीपाचा माल विकून मिळालेला संपूर्ण पैसे हरतात. यातून समोरचे वर्ष बिना पैशाचे कसे काढायचे यां विवंचनेतून यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. याच कोंबड बाजार जुगारांतून हरलेल्या शेतकऱ्याने पत्नीशी भांडण झाल्याने मारेगाव तालुक्यात दोघेही पती पत्नीने काही वर्षांपूर्वी उभयता आत्महत्या केल्याचे उदाहरण आहे.
या झुंजींसाठी कोंबड्यांना खास प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना बदाम-पिस्त्यांसारख्या सुक्या मेव्याचा खुराक देतात. तसंच या कोंबड्यांचीसुद्धा प्रॅक्टिस मॅच होते. झुंजीत जो कोंबडा मरतो तो हरतो. मेलेल्या कोंबड्याचं मांस तर खाल्लं जातंच, पण जिंकलेल्या कोंबड्यालाही मारून खाल्लं जातं. जिंकलेल्या कोंबड्याचं मांस खाल्ल्याने त्याच्यासारखी शक्ती येते, असा समज आहे. सुरुवातीच्या काळात कोंबड्यांची झुंजीचं स्वरूप साधं होतं. झुंजणाऱ्या दोन कोंबड्यांपैकी जो कोंबडा अधिक शक्तिशाली तो कोंबडा जिंकायचा. पण अलीकडे कोंबड्यांच्या पायांना धारदार चाकू लावले जातात. यामुळे कोंबडे गंभीररीत्या जखमी होतात.
सुप्रीम कोर्टाने कोंबड्यांच्या पायांना चाकू बांधण्यावर बंदी घालण्याचे आदेश देऊनही यंदाच्या झुंजींमध्ये त्या आदेशांचं सर्रास उल्लंघन झालेलं आढळलं. जिल्ह्यात अवैध धंदे जोरात चालत असल्याची तक्रार देखील जिल्ह्यातील आमदारांनी केली होती. ठाणेदारांना यवतमाळ पोलिस अधीक्षक यांनी अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही अशी सक्त ताकीद देऊनही हे अवैध धंदे सुरूच आहेत. पोलीस अधीक्षक आता नेमकी कोणती कारवाई करतात यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

































































