मार्लेश्वरचा संक्रांत उत्सव

278

>> आशुतोष बापट

आंबा घाटाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशीत वसलेला नितांत रमणीय देवरुख परिसर. टिकलेश्वर, भवानीगड, मैमतगड, कुंडी घाटाचा जुना व्यापारी मार्ग अशीअनेक ऐतिहासिक स्थळं या परिसरात विखुरलेली आहेत. याच वाटेतलं मारळ गाव आणि मार्लेश्वर हे सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणसुद्धा इथेच वसलेले आहे. मार्लेश्वर म्हटले की तिथला प्रचंड धबधबा, गुहेतला महादेव आणि गुहेत असणारे नाग-सापांचे अस्तित्व या गोष्टी समोर येतातच.

निसर्गरम्य कोकणात राहणाऱया कोकणी माणसाचे आणि सण-उत्सवांचे एक अतूट नाते आहे. शिमगा आणि गौरी-गणपती हे दोन सण म्हणजे कोकणवासीयांचे जीव की प्राण असतात. कितीही दूरवर असला तरी कोकणी माणूस वेळात वेळ काढून या दोन सणांना हटकून आपल्या गावी येतोच येतो. पण एकूणच कोकणी माणूस हा उत्सवप्रिय आहे. सण साजरा करायला त्याला कुठलेही निमित्त पुरते. मकरसंक्रांत आणि मार्लेश्वर यांचेसुद्धा असेच अतूट नाते आहे. आंबा घाटाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशीत वसलेला देवरुख परिसर नितांत रमणीय आहे. टिकलेश्वर, भवानीगड, मैमतगड, कुंडी घाटाचा जुना व्यापारी मार्ग अशी अनेक ऐतिहासिक स्थळे या परिसरात विखुरलेली आहेत. मारळ गावचा मार्लेश्वर हे सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणसुद्धा इथेच वसलेले आहे. मार्लेश्वर म्हटले की तिथला प्रचंड धबधबा, गुहेतला महादेव आणि गुहेत असणारे नाग-सापांचे अस्तित्व या गोष्टी समोर येतातच. परंतु मार्लेश्वरशी निगडित असलेल्या काही दंतकथा आणि काही ऐतिहासिक कथा यामुळे या ठिकाणाचे महत्त्व जास्तच उठून दिसते.

देवरुखपासून जेमतेम 12 कि.मी वर असलेल्या मार्लेश्वरचा आणि मकरसंक्रांतीचा जवळचा संबंध आहे. 14 जानेवारी म्हणजे संक्रांत. हा मार्लेश्वराचा उत्सवाचा दिवस. या दिवशी मार्लेश्वराचा विवाह सोहळा असतो. साखरप्याच्या गिरिजादेवीशी मार्लेश्वराचा विवाह या संक्रांतीच्या दिवशी होतो. या दिवशी वेगवेगळ्या गावांतून देवदेवतांच्या पालख्या येतात. जवळच असलेल्या आंगवली गावात मार्लेश्वर प्रथम प्रकट झाला म्हणून या गावातील मार्लेश्वर मंदिरातून देवासाठी चांदीचा मुकुट इथे आणला जातो. या सोहळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक इथे दर्शनाला येतात. त्यावेळी अन्नछत्र तसेच औषधपाण्याची मोफत सुविधा पुरवली जाते. आपल्या भारतवर्षात कुठलेही देवस्थान असले की त्याच्याशी अत्यंत सुंदर अशा लोककथा निगडित असतात. मार्लेश्वरदेखील त्याला अपवाद नाही. याचीही एक सुंदर दंतकथा पंचक्रोशीत सांगितली जाते ती अशी –
भगवान परशुरामाने देवरुखचा वाडेश्वर, संगमेश्वरचा कर्णेश्वर आणि मारळचा मार्लेश्वर यांची स्थापना केली असे मानले जाते. शिलाहारवंशीय राजवटीला उतरती कला लागली. पैसा आणि जहागिरीच्या लोभापायी लोक नाती विसरले आणि एकमेकांचा जीव घेऊ लागले. श्री मार्लेश्वरला हे सगळे असह्य झाले. देव देवळातून बाहेर पडला आणि दऱया-कपाऱया हिंडू लागला. शांत निवांत स्थळ शोधू लागला. देव अंधारात रानेवने तुडवीत होता. गावाबाहेर एका झोपडीत शिवाचे नामस्मरण करीत आयुष्य जगणाऱया एका चर्मकाराने अंधारातून वाट तुडवणाऱया देवाला दिवटी घेऊन वाट दाखवली. मुखी शिवनाम घेत जाणाऱया त्या चर्मकाराला देवाने मार्लेश्वराच्या गुहेशी आल्यावर निरोप दिला. दुसरे दिवशी देवळातून देव गायब झाल्याचा बोभाटा झाला. ‘आपण गावकऱयांच्या दुराचाराला कंटाळून देऊळ सोडून डोंगरात राहिलो आहोत’ असा दृष्टांत पुजाऱयाला झाला. लोकांनी बराच शोध घेऊनही देव सापडला नाही. पुढे गावावर रोगराई, जुलमी आक्रमणे अशी अनेक संकटे कोसळली. नंतर काही काळाने सावंत-साळुंखे घराण्यातील काही मंडळींनी गावातील सगळ्या जाती-जमातीच्या लोकांना एकत्र करून परक्या आक्रमकांना लढाई करून हुसकावून लावले. सर्व लोकांनी आपापल्या परीने उत्तम आचरण करून गावाला वैभवाचे दिवस आणले. आंगवली-मैमतगडाच्या परिसरात ज्या स्थानी हे युद्धकांड घडलं आणि शत्रूला कंठस्नान घातलं ती जागा ‘मारलं’ या नावाने विख्यात झाली.

पुढे इ. स. 1800 च्या सुमारास आंगवलीचे सरदार अणेराव साळुंके शिकारीला गेले असता श्वापदाचा पाठलाग करत करत घनदाट अरण्यात गेले. एका लहान गुहेच्या तोंडातून ते श्वापद आत गेलेले त्यांनी पाहिले. तिथली माती बाजूला करून ते आत जातात तर त्यांना श्री महादेवाच्या पिंडीचे दर्शन झाले. साळुंके सरदारांना जाणवले की आरे हाच तो श्री मार्लेश्वर. तो दिवस होता मकरसंक्रांतीचा. महादेवाच्या पुनर्भेटीचा हा सोहळा मकरसंक्रांतीला पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा उत्साहात साजरा करतात. मार्लेश्वरला जाण्यासाठी दगडी पायऱया बांधून काढलेल्या आहेत. जत्रेच्या निमित्ताने वाटेत अनेक वस्तूंची दुकाने थाटलेली दिसतात. निसर्गाच्या ऐन कुशीत असलेले हे स्थान मोठे रमणीय आहे. गुहेपाशी आल्यावर आजूबाजूचा नजारा पाहून थकवा निघून जातो. बाजूचे जंगल हे साग, फणस, ऐनाच्या वृक्षांनी बहरलेले आहेत. खंडय़ा, भारद्वाज आणि मुख्यत्वे करून इथे शिंगचोचा म्हणजे हॉर्नबिल पक्षी दिसू शकतात. हॉर्नबिलला स्थानिक भाषेत त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून ‘ककराण्या’ असे म्हणतात. श्री मार्लेश्वराच्या गुहेत मंद दीप जळत असतात. अतिशय प्रसन्न आणि गूढ असे इथले वातावरण असते.

मंदिराच्या पाठीमागे कोसळणाऱया धबधब्यामुळे इथले सगळे वातावरण प्रफुल्लित झालेले असते. या धबधब्याच्या वरसुद्धा डोंगरात अजून धबधबे आहेत. ऐन पावसाळ्यात धबधब्याचे रौद्र स्वरूप अनुभवता येते. कोकणच्या भेटीत मार्लेश्वरला भेट देणे अनिवार्य आहे. ‘जागा सुंदर गहन तेथे सुखावले मन तेथे जावया संतोष वाटतसे’ या समर्थ रामदासांच्या वाक्याचा पुरेपूर अनुभव मार्लेश्वरला आल्यावर घेता येतो.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या