
‘मार्मिक’च्या व्यंगचित्रांतून मराठी माणसावरील अन्यायाला वाचा पह्डणारी आणि त्या अन्यायावर धारदार वार करणारी चळवळ निर्माण झाली. त्यातून शिवसेना या संघटनेचा जन्म झाला. अनेक संकटे आली, पण ‘संकटाच्या छाताडावर चालून जा’ या प्रबोधनकारांच्या प्रेरणेने ‘मार्मिक’ सुरू राहिला. ‘लढायचं नाही’ हा खाक्या बदलून रडायचं नाही लढायचं, डरायचं नाही लढायचं ही वृत्ती मार्मिकने दिली. मार्मिक ही मशाल आहे. ती हातात असल्यानंतर स्वाभिमान म्हणजे काय हे मराठी माणूस विसरू शकत नाही. मराठी माणसाला ताकद देणारा हा मार्मिक चिरायु होवो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मार्मिकच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या.
व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचा 61 वा वर्धापन दिन आज ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्मिकचे वाचक, शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींना मार्गदर्शन करताना व्यंगचित्रांच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसावरील अन्यायाविरोधात कसा लढा उभा केला याची आठवण करून दिली. नोकरी सोडा आणि व्यवसाय करा हे सांगणं खूप सोपं आहे, पण करायला खूप कठीण आहे. पण तेसुद्धा शिवसेनाप्रमुखांनी करून दाखवलं. फ्री प्रेसमधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून त्यांनी स्वतःचे साप्ताहिक सुरू केले तेसुद्धा व्यंगचित्र साप्ताहिक. त्यांचा हा निर्णय मोठा धाडसाचा होता. सुरुवातीला मराठी माणसाच्या मनोरंजनासाठी सुरू झालेल्या ‘मार्मिक’मधील जागा मराठी माणसाच्या मनोव्यथांनी घेतली. स्वतःच्याच घरात मराठी माणसावर अन्याय होतोय हे लक्षात आल्यानंतर ‘मार्मिक’च्या व्यंगचित्रांतून चळवळ उभी राहिली आणि शिवसेना या संघटनेचा जन्म झाला.
मार्मिक कोणत्याही संकटात थांबला नाही – सुभाष देसाई
‘मार्मिक’ साप्ताहिक सुरू करण्याचे शिवसेनाप्रमुखांनी ठरवल्यापासून अनेक संकटे आली. अगदी अंकाच्या छपाईपासून ते भांडवलापर्यंत. पण शिवसेनाप्रमुख कधीच खचून गेले नाहीत. 13 ऑगस्ट 1960 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते ‘मार्मिक’चा पहिला अंक दिमाखात प्रसिद्ध झाला. अनेक अडचणींचा सामना करीत आजही ‘मार्मिक’चा अखंड प्रवास सुरू आहे, ‘मार्मिक’ थांबायला तयार नाही, तो नव्या रूपात आपल्यासमोर आला आहे, असे शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.
प्रहसन, गीतांच्या सादरीकरणाने सोहळ्यात रंगत
कार्तिकी गायकवाड हिने सादर केलेले ‘मोगरा फुलला’, ‘गगन सदन तेजोमय’ हे गीत, त्याचप्रमाणे मराठी माणसाला व्यवसायाकडे वळा अशी साद घालणाऱया प्रसाद खांडेकर आणि नम्रता आवटे यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन मृण्मयी गोडबोले यांनी केले. कार्यक्रमासाठी शिवसेना नेते, पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठय़ा संख्येने ऑनलाइन उपस्थित होते.
शिवसेनेसाठी ‘सामना’ला जन्म घ्यावा लागला. आजसुद्धा शिवसेना आणि सामना काय करतो आहे हे पूर्ण देश बघतो आहे. ‘सामना’चा अग्रलेख हा प्रसिद्धीमाध्यमांवर प्रसिद्ध होत आहे. ही ‘सामना’ची आणि शिवसेनेची ताकद आहे. तिचा जन्मदाता ‘मार्मिक’ आहे.
अन्यायाच्या छाताडावर वार करण्याची हिंमत मराठी माणसात आजही आहे
‘मार्मिक’च्या वर्धापन दिनानिमित्त सादर झालेल्या प्रहसनात मराठी माणसाला व्यवसायाकडे वळण्याचा संदेश देण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाला कोणी आळशी म्हणत असेल. मराठी माणूस व्यवसाय करीत नाही, असे म्हणत असेल तसा समजही असेल, पण मराठी माणूस लढय़ासाठी कधीही मागेपुढे पाहत नाही. जर का अन्याय होत असेल तर अन्याय करणारा कितीही मोठा असेल तरी त्याच्या छाताडावर वार करण्याची हिंमत मराठी माणसाने पिढय़ान् पिढय़ा दाखविली आहे आणि ती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे.





























































