छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नगर शहरात घडली आहे. याप्रकरणी पतीसह तीनजणांवर तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिमानी वीरेंद्र शेकटकर (रा. चितळे रोड, नगर) असे विवाहितेचे नाव आहे. पती वीरेंद्र अशोकराव शेकटकर, सासरे अशोकराव शेकटकर, सासू सुरेखा अशोकराव शेकटकर (तिघे रा. चितळे रोड, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हिमानीची आई अलका संजय भंडारे (वय 53, रा. अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

हिमानीचा विवाह मे 2012मध्ये वीरेंद्र शेकटकरसोबत झाला होता. सुरुवातीची दोन वर्षे सासरच्या लोकांनी तिला व्यवस्थित नांदविले. त्यानंतर पतीसह सासू-सासरे तिला सतत शारीरिक व मानसिक त्रास देऊन ‘आमची बदनामी करते,’ असे म्हणून उपाशी ठेवून छळ करू लागले. याबाबत हिमानी वेळोवेळी तिच्या आई-वडिलांना सांगत होती. 16 मार्चला हिमानीने तिचा भाऊ हिमांशू संजय भंडारे यांना फोन करून, ‘माझ्या सासरचे लोक खूप त्रास देतात. मला येथे राहायचे नाही. तू मला आताच्या आता नगरला घेऊन जा,’ असे सांगितले. त्यानंतर हिमानीने 17 मार्चला सकाळी घरी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी हिमानीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.