
लडाख येथे देशसेवा बजावताना वीरमरण आलेले शहीद जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आसले (ता. वाई, जि. सातारा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सोमनाथ यांचा मुलगा यश याने पार्थिवाला मुखाग्नी दिला. गावकऱ्य़ांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना साश्रुपूर्ण निरोप दिला. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. शहीद जवान मांढरे यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
शहीद जवान सोमनाथ मांढरे यांची शनिवारीच (दि. 18) लडाख येथे नियुक्ती झाली होती. देशसेवा बजावत असताना प्रतिकूल वातावरणाचा सामना करताना त्यांना वीरमरण आले. हवामानातील बदलामुळे त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले. लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शहीद जवान सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याचे वृत्त समजताच आसले गावात शोक व्यक्त करण्यात आला. शहीद मांढरे यांचे पार्थिव रविवारी वाई तालुक्यातील आसले गावात आणण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या लष्कराच्या वाहनातून शहीद सोमनाथ मांढरे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. ‘अमर रहे अमर रहे…सोमनाथ मांढरे अमर रहे,’ ‘भारत माता की जय,’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचली. येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, माजी आमदार मदन भोसले, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण यांनी शहीद जवान सोमनाथ मांढरे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
पोलीस व सैन्यदलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँड पथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर भाऊ राहुल, पत्नी प्रियंका, मुलगा यश व मुलगी आराध्या (वय 10 महिने) यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला. यावेळी पालकमंत्री पाटील, आमदार मकरंद पाटील, अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी मांढरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.


























































