मशालच महाराष्ट्राला अंधारातून बाहेर काढेल! आदित्य ठाकरे यांची गोरेगावात शिवगर्जना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता भाजप आणि गद्दारांमध्येही वाद सुरू झाले आहेत. भाजपलाही प्रश्न पडलाय… झाले ते बरोबर झालेय का? कारण ज्या 33 देशांनी मिंध्यांच्या गद्दारीची नोंद घेतली तिथेही कळले आहे की झालेय ते योग्य नाही. गद्दारी त्यांनाही पटलेली नाही. कोणताही सर्व्हे घ्या. प्रत्येक सर्व्हे गद्दारांच्या विरोधात जातोय. म्हणूनच मुंबईच्या निवडणुका अजून झालेल्या नाहीत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे नेत होतो. त्याला दृष्ट लागली. पाठीत खंजीर खुपसला गेला. आज महाराष्ट्रात सर्वत्र अंधार दाटलाय. पण या अंधारातही शिवसेनेच्या हाती वेगळे शस्त्र आले आहे. धगधगती मशाल. ती मशालच या अंधारातून महाराष्ट्राला बाहेर काढेल, असा जबरदस्त आत्मविश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज गोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरील ‘शिवगर्जना’ कार्यकर्ता मेळाव्यात केला.

शिवगर्जना मेळाव्याला निष्ठावंत शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीच्या साक्षीने  आदित्य ठाकरे यांनी चाळीस गद्दारांवर हल्ला चढवला.

सर्व्हे गद्दारांच्या विरोधात जात आहेत म्हणूनच मुंबईच्या निवडणुका झालेल्या नाहीत

‘‘आता भाजप आणि गद्दारांमध्येही वाद सुरू झाले आहेत. भाजपलाही प्रश्न पडलाय… झालं ते बरोबर झालेय का? कारण ज्या 33 देशांनी मिंध्यांच्या गद्दारीची नोंद घेतली तिथेही कळले आहे की झालेय ते योग्य नाही. गद्दारी त्यांनाही पटलेली नाही. कोणताही सर्व्हे घ्या. प्रत्येक सर्व्हे गद्दारांच्या विरोधात जातोय. म्हणूनच मुंबईच्या निवडणुका अजून झालेल्या नाहीत,’’ अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी या वेळी केली.

गेलात तिथेच रहा, पुन्हा आला नाहीत तर बरंच आहे

शिवसेनेच्या सभांना होणारी गर्दी पाहून गद्दारांना धडकी भरतेय असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी गद्दारांची काय अवस्था झाली आहे हेसुद्धा या वेळी सांगितले. ‘मिंधे गटातील आमदार हे शिवसेनेच्या आमदारांना ‘साहेब आम्हाला परत घेतील का?’ असे प्रश्न विचारू लागले आहेत. आम्हाला गद्दार बोलायला लावू नका, हवंतर विश्वासघातकी म्हणा, असे बोलत आहेत. अरे गद्दारांनो, मागचा पुढचा दरवाजा ज्याने गेलात तिथेच रहा. पुन्हा आला नाहीतर बरं आहे,’’ असे आदित्य ठाकरे यांनी या वेळी बजावले. गद्दार आमदारांचा माज पाहिला तर अशा लोकांसोबत आपण एवढे दिवस कसे बसलो, असा प्रश्न पडतो आणि भाजपलाही हे कसे पटतेय, असा सवालही त्यांनी केला.

आठ महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मिंधे सरकारच्या आठ महिन्यांच्या काळात सुमारे दीड हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असा थेट आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपये मदत दिली होती. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती. सध्याच्या सरकारने मात्र अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना अजून एक रुपयाही दिलेला नाही, असेही ते म्हणाले. शेताच्या बांधापासून आपण लांब आहोत, पण जे ताटात येते ते देणारा शेतकरी जगला पाहिजे, असे ते म्हणाले.

पर्यावरण संरक्षणाचे कामच मिंधे सरकारने रोखले

पर्यावरण संरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने हाती घेतलेली कामे मिंधे सरकारने बंद पाडली आहेत. आज तापमान 35 अंशांवर पोहोचले आहे. मग मे महिन्यात मुंबई, पुणे आणि देशाचे काय हाल होतील? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

 गेल्या पाच ते सहा महिन्यांत एकही उद्योग मुंबई, महाराष्ट्रात आलेले नाही

‘सध्याच्या डबल इंजिन सरकारचे इंजिन फेल गेले आहे. भंगारातून काढलेले इंजिन असल्याने ते सुरूच होत नाही. देवेंद्र फडणवीस हे सतत धक्का देण्याचा प्रयत्न करतात,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. विधिमंडळात बोलायला उभे असतात तेव्हा मुख्यमंत्री सारखे शर्ट खाली खेचत उभे असतात आणि उत्तर मात्र फडणवीस देतात, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी त्यांची नक्कलही करून दाखवली. सीएम की सुपर सीएम राज्य चालवताहेत? असा खोचक सवालही त्यांनी केला.

‘आपला दवाखाना’त औषधेच नाहीत

शिवसेनेने मुंबईसाठी केलेल्या कामांचा दाखलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. कोस्टल रोड, बेस्टसाठी इलेक्ट्रिक बसेस, 500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, नदीजोड प्रकल्प याचे दाखले त्यांनी दिले. मिंधे सरकार जाहिरात करत असलेली ‘आपला दवाखाना’ ही योजना महाविकास आघाडी सरकारचीच असल्याचे ते म्हणाले. या योजनेच्या जाहिरातींवर भरमसाट खर्च केला जातोय; परंतु दवाखान्यात औषधेच मिळत नाहीत, डॉक्टरांचे पगारही मिळत नाहीत अशी वस्तुस्थितीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितली.

जे उद्धव ठाकरे यांचे नाही झाले ते महाराष्ट्राचे, भाजपचे काय होणार…

हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेतून बाहेर पडलो असा दावा करणाऱ्या गद्दारांवर आदित्य ठाकरे यावेळी तुटून पडले. शिवसेनेचे हिंदुत्व हे भगवान रामाचे हिंदुत्व आहे. महाराष्ट्र आणि राष्ट्राचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे आहे, असे ते म्हणाले. हे 40 जण उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत ते महाराष्ट्राचे आणि भाजपचे काय होणार? असा हल्लाबोलही त्यांनी केला.

ही गद्दारांविरुध्दची नव्हे… देशाची लढाई आहे

ही लढाई या गद्दारांविरुध्दची नाही. ही देशाची लढाई आहे, लोकशाही टिकवण्याची आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. लोकशाही आणि संविधानाला मानत असू तर या 40 लोकांनी राजीनामे द्यावून निवडणुकीला सामोरे जायला हवे होते. पण या सरकारला संविधान संपवायचेय. लोकशाही बाजूला ठेवायची आहे, असा आरोप त्यांनी केला.

अलिबाबा… वरळीतून लढायची हिंमत नसेल तर मी ठाण्यात येतो… सरळ फाईट होऊन जाऊ द्या…

आदित्य ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचा ‘अलिबाबा’ असा उल्लेख करत उघड आव्हान दिले. ते म्हणाले की, ‘अलिबाबाला सांगतोय…माझ्या वरळीतून लढायची तुमची हिंमत नसेल तर मी ठाण्यात येतो. कारण ठाणेही आमचेच आहे. शिवसेनेचे आहे. ठाणे काय कसब्यातही दाखवलेय महाविकास आघाडी काय करू शकते. महाराष्ट्रात कोणताही मतदारसंघ निवडा. सरळ फाईट होऊ द्या…तुम्ही विरुद्ध आम्ही. मग दाखवतो की शिवसेना म्हणजे काय असते! नुसते हातात धनुष्य असून चालत नाही. हातात ताकद लागते. जिगर लागते आणि हृदय साफ लागते धनुष्यबाण हाती घ्यायला.’

रघुकुल रित सदा चली आये… प्राण जाये पर वचन न जाये!

जनतेला दिलेली वचने पूर्ण केली… ती त्यांच्यासमोर घेऊन जाऊ 

‘शिवसेनेने आतापर्यंत जी-जी वचने दिली ती पूर्ण करून दाखवली. रघुकुल रित सदा चली आये…प्राण जाये पर वचन न जाये! ती वचने घेऊनच घरोघरी जाऊ.’ असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले.

मिंधे मुख्यमंत्र्यांनी तर पंतप्रधानही बदलून टाकले

कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फेसबुक लाइव्हची मिंध्यांनी थट्टा केली होती. उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हने त्या वेळी अनेक लोकांचे प्राण वाचवले. आता घटनाबाह्य मुख्यमंत्रीही फेसबुक लाइव्ह करू लागले आहेत, पण त्यांनी त्यावर पंतप्रधानच बदलून टाकले, अशी खिल्ली आदित्य ठाकरे यांनी उडवताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आमदारावर कारवाई होत नाही हे दुर्दैव

गणपती विसर्जनाच्या मिरणुकीत प्रभादेवी येथे गोळीबार करणारे मिंधे गटातील आमदार सदा सरवणकर यांचाही समाचार यावेळी आदित्य ठाकरे यांनी घेतला. गणपती विसर्जनावेळी बंदुकीतून गोळीबार करणे हा अतिरेकी हल्ला नाही तर काय? असा सवाल त्यांनी केला. सरवणकर यांची बंदूक त्यांची होती, पण गोळी त्यांनी चालवली नाही असे उत्तर यासंदर्भातील प्रश्नावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिले. मग तो व्हिडीओ कसला होता? अशीही विचारणा त्यांनी केली.

सभागृहात भारतमाता की जय म्हणतात, पण भारतमातेच्या रक्षणासाठी उभे असणाऱ्या पोलीस बांधवांवर गोळी झाडतात. अशा आमदारावर कारवाई झाली पाहिजे की नाही? तो जेलमध्ये गेला पाहिजे की नाही? असे सवालही त्यांनी उपस्थित केले. तोच गोळीबार अन्य कुणाकडून झाला असता तर त्याला अतिरेकी हल्ला म्हणून एनआयएने उचलले असते, असे ते म्हणाले. माझे पोलीस बांधव उभे असतात त्यांच्यावर गोळी चालवली त्या आमदारावर कारवाई झाली की नाही पाहिजे, तो जेलमध्ये गेला पाहिजे की नाही. हेज जर कुणी दुसरे असते तर एनआयएने त्याला उचलले असते. अतिरेकी हमला म्हणून आत टाकले असते, असे सांगतानाच पोलिसांवर गोळय़ा चालवणाऱ्यांवर कारवाई होत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

‘सीएम’ म्हणजे करप्ट माणूस…

‘आजपासून आपल्या राज्यात ‘सीएम’ या शब्दाचा अर्थ वेगळा. करप्ट माणूस,’ असा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. शिंदे यांच्या काळात बघावे तिथे घोटाळा सुरू आहे. मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या हक्काचे 1700 कोटी रुपये अक्षरशः वाया घालवले जात आहेत. या सौंदर्यीकरणासाठी चांगली बांधकामेही तोडली जात आहेत, असे ते म्हणाले. पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी तीन ते पाच कोटींची बोली लावली जात असून त्यासाठी गद्दार आमदारांच्या बंगल्यांवरून पह्न जात आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का? असे आदित्य ठाकरे यांनी विचारले असता उपस्थित गर्दीने ‘नाही…’ असा प्रतिसाद दिला. हिंमत असेल तर निवडणूक लढा, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.