कोरोना इज बॅक! दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती, नियम मोडल्यास 500 रुपयांचा दंड

गेला, गेला म्हणता म्हणता कोरोना पुन्हा आला आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. सक्रिय रुग्णांचा आकडा सव्वा लाखांच्या पार गेल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. राजधानी दिल्लीमध्येही कोरोना वेगाने वाढू लागल्याने सत्ताधारी आम आदमी पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असा आदेश सरकारने जारी केला आहे. दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाचा दर 17 टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने सरकारचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत कोरोनाने पुन्हा एकदा उसळी घेतल्याने सरकारने मास्कसक्तीचा निर्णय घेतला आहे. अर्थात कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी हा नियम लागू असणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये बुधवारी 2 हजार 495 नवीन कोरोना रुग्ण आढळले, तर 8 जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत कोरोना संक्रमणाचा दर 17.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. राजधानीमध्ये सध्या 8 हजार 205 सक्रुय रुग्ण असून यातील 5 हजार 549 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासांमध्ये 16 हजार 299 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 1 लाख 25 हजार 6 रुग्ण सक्रिय असून एकूण मृतांचा आकडा 5 लाख 26 हजार 879 वर पोहोचला आहे.