मास्क लावल्याने कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो; IIT मुंबईच्या संशोधनातील निष्कर्ष

कोरोना संक्रमण रोखण्यात मास्क महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आयआयटी मुंबईच्या एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. मास्क लावल्याने कोविड कफ क्लाउड्स म्हणजेच शिंक किंवा खोकल्याद्वारे पसरणारे कोरोनाचे तुषार पसरण्यावर 7 ते 23 टक्क्यांपर्यत नियंत्रण येते. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आणि संक्रमण रेखण्यास मदत होते. त्यामुळे मास्क म्हणजे सोशल वॅक्सिन असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

कोरोनाबाधितांच्या शिंकेतून बाहेर पडणाऱ्या तुषारांद्वारे पसरणाऱ्या कोरोनाच्या विषाणूचा आकार आणि संख्या कमी करण्यात मास्क उपयोगी आहेच. त्याचप्रमाणे रुमाल वापरण्याचा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. रुमाल वापरण्यानेही विषाणूंचा फैलाव रोखण्यास मदत होत असल्याचे, आयआयटी मुंबईचे प्रोफेसर अमित अग्रवाल आणि रजनीश भारद्वाज यांनी सांगितले. या दोघांचे हे संशोधन अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या फिजिक्स ऑफ फ्लूड्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

मास्क लावल्याने फैलावणाऱ्या कोरोना व्हायरसची संख्या सातपटींनी कमी होते. तर एन 95 मास्क वापरल्याने ही संख्या 23 पटींपर्यंत कमी होते. शिंक आल्यानंतर हवेत किंवा कोणत्याही पृष्ठभागावर तुषारांद्वारे व्हायरस पसरण्यास सुरुवातीचे 5 ते 8 सेंकद महत्त्वाचे असतात. त्यातून कोरोना व्हायरसचा फैलाव होतो, असे डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितले. जेट थेअरीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आल्याचे ते म्हणाले.

शिंकताना किंवा खोकताना रुमाल वापरल्यास किंवा कोपर तोंडावर धरल्यासही हवेत पसरणाऱ्या व्हायरसची संख्या कमी होत असल्याचे डॉक्टर भारद्वाज यांनी सांगितले. या सोप्या उपायांमुळे कोरोना संक्रमण पसरण्याचा धोका कमी होत असल्याचे ते म्हणाले. हवेतील कफ क्लाऊड शोधण्यासाठीही आयआयटी मुंबईच्या पथकाने संशोधन करून फॉर्म्युला तयार केला आहे.

या फॉर्म्युल्यामुळे रुग्णालयातील वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या निश्चित करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच एखाद्या कक्षात, सिनेमागृहात, कार आणि एअरक्राफ्टमध्ये हवा खेळती ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणू पसरण्याचा आणि कोरोना संक्रमणाचा धोका कमी होणार आहे, असे संशोधकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या