मसाज करायला आली आणि दागिने घेऊन पळाली

2079

सध्या मसाज पार्लर, स्पा इत्यादी सुविधांचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून या सेवा अगदी घरपोच मिळू लागल्या आहेत. पण, या सेवांचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. कारण, अनेकदा मसाजच्या नावाखाली अनेक गैरप्रकारही चालतात. अशाच एका घटनेत मसाज करणाऱ्या महिलेने मौल्यवान अंगठी पळवल्याचं उघड झालं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 3 नोव्हेंबर रोजी गुरुग्राम येथे ही घटना घडली. पीडित तरुणीने एका मसाज अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मसाज करवून घेण्यासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार अॅप्लिकेशनकडून एक महिला 3 तारखेला सायंकाळी सहा वाजता तरुणीच्या घरी पोहोचली. मसाज करण्यापूर्वी अंगठी, बांगड्या आणि अन्य दागिने बाथरूममध्ये काढून ठेवले होते. सात वाजता मसाज झाल्यानंतर तरुणीने मसाजचे पैसे चुकते केले.

पैसे घेण्यापूर्वी महिलेने हात धुण्यासाठी बाथरूममध्ये जाण्याची परवानगी मागितली. तरुणीने तिला बाथरूममध्ये जाण्याची परवानगी दिली. मसाज करणाऱ्या महिलेने बाथरुममध्ये हात धुतले आणि ती बाहेर येऊन पैसे घेऊन निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणीला आपल्या दागिन्यांमधून अंगठी गायब झाल्याचं आढळलं.

ही अंगठी त्यांच्या पारंपरिक दागिन्यांपैकी एक होती. त्यामुळे त्या अंगठीची किंमत तब्बल पाच लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. तरुणीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या